Homeताज्या बातम्या

‘सिंदुर’मोहिमेचा अध्याय अद्याप संपलेला नाही; गरज भासल्यास पुढील टप्प्यासाठी तिन्ही सेना सज्ज – जनरल उपेंद्र द्विवेदी

पुणे : देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नसून, 'सिंदुर' मोहिमेचा अध्याय अद्याप संपलेला नाही, असे स्पष्ट संकेत भारतीय लष्करप्

पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा दरम्यान तणाव; काय आहे परिस्थिती?
पुण्यात जनगणना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण; पालिका आयुक्तांचे पोलिसांना कारवाईचे निर्देश
बापूसाहेब देशमुख लिखित छत्रपती शिवरायांवरील दोन पुस्तकांचे आज पुण्यात भव्य प्रकाशन; उपमुख्यमंत्री आणि शाहू छत्रपतींची उपस्थिती

पुणे : देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नसून, ‘सिंदुर’ मोहिमेचा अध्याय अद्याप संपलेला नाही, असे स्पष्ट संकेत भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिले. सध्याची सीमावर्ती परिस्थिती ही केवळ युद्धविरामासारखी असल्याचे सांगत त्यांनी गरज पडल्यास या मोहिमेच्या पुढील टप्प्यासाठी तिन्ही सैन्यदले चोवीस तास सज्ज असल्याचे नमूद केले.

पुण्यातील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) दीडशेव्या दीक्षांत संचलन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी संचलनाची सलामी स्वीकारली. देशातील भविष्यातील लष्करी नेतृत्व घडवणाऱ्या नवोदित अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी बदलती युद्धनीती, आधुनिक तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या नव्या आव्हानांवर भाष्य केले.

जनरल द्विवेदी म्हणाले की, ‘सिंदुर’ मोहिमेने भारत शत्रूच्या चिथावणीला कशा प्रकारे ठाम आणि प्रभावी प्रत्युत्तर देतो, याचा नवा आदर्श निर्माण केला आहे. लष्करी सेवेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने हा आदर्श कायम राखण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आजच्या काळातील युद्ध पूर्णपणे पारदर्शक स्वरूपाचे झाले आहे. प्रत्येक हालचालीवर चोवीस तास लक्ष ठेवले जात असल्याने सैनिकांची तैनाती, मोहिमांचे नियोजन आणि सीमावर्ती नागरिकांच्या सुरक्षेबाबत अत्यंत सावध राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. माहितीच्या क्षेत्रातील संघर्षालाही तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. भविष्यातील युद्धांमध्ये निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान होणार असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले.

मित्र राष्ट्रांतील प्रशिक्षणार्थींचाही सहभाग या संचलन सोहळ्यात देशातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसह बारा मित्र राष्ट्रांमधील चोवीस प्रशिक्षणार्थींचाही सहभाग होता. विविध देशांतून आलेले हे युवक एकाच मूल्यव्यवस्थेने आणि समान आदर्शांनी जोडले गेले असल्याचे सांगत जनरल द्विवेदी यांनी त्यांचे कौतुक केले. या वेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ‘चिता’ पथकाचे विशेष अभिनंदन करण्यात आले. संचलनादरम्यान आकर्षक हवाई प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पथके आणि आकाशातून उडी मारणाऱ्या विशेष दलांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

COMMENTS