Homeताज्या बातम्या

आकाशप्रेमींसाठी आज दुर्मिळ ‘ब्लू मून’चा योग; खगोलप्रेमींमध्ये उत्सुकता

पुणे : आकाशगंगेविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. याच कुतूहलापोटी अनेक खगोलीय घटनांचा उलगडा होत गेला आहे. असाच काहीसा दुर्मिळ योग, अर्थात 'ब

शून्य सावली दिवस : वैज्ञानिक घटना समजून घ्या; अंधानुकरण टाळा – डॉ. वैद्य
आजचा 21 जूनचा दिवस वर्षातील सर्वात मोठा13 तास 13 मिनिटे सूर्यप्रकाशाचा मिळणार अनुभव
भेंडवळच्या भविष्यावरून अंनिसचे खुले आव्हान;श्याम मानव यांनी जाहीर केले 80 लाखांचे बक्षीस

पुणे : आकाशगंगेविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. याच कुतूहलापोटी अनेक खगोलीय घटनांचा उलगडा होत गेला आहे. असाच काहीसा दुर्मिळ योग, अर्थात ‘ब्लू मून’चा (निला चंद्र) योग रविवारी आकाशप्रेमींना अनुभवता येणार आहे. मे महिन्यातील दुसरी पौर्णिमा याच दिवशी येत असल्याने या पौर्णिमेला खगोलशास्त्रात ‘ब्लू मून’ असे संबोधले जाते. मात्र, या नावामुळे चंद्राचा रंग निळा दिसेल असा गैरसमज करून घेण्याचे कारण नाही. हा चंद्र नेहमीच्या पौर्णिमेप्रमाणेच तेजस्वी आणि पांढऱ्या रंगाचाच दिसणार आहे.

खगोलीय गणनेनुसार, दोन पौर्णिमांमधील कालावधी साधारणपणे २९.५ दिवसांचा असतो. त्यामुळे एखाद्या महिन्याच्या सुरुवातीला पौर्णिमा आल्यास त्याच महिन्याच्या अखेरीस आणखी एक पौर्णिमा येण्याची शक्यता निर्माण होते. अशा परिस्थितीत महिन्यात येणाऱ्या दुसऱ्या पौर्णिमेला ‘ब्लू मून’ असे नाव दिले जाते. यंदा १ मे रोजी पहिली पौर्णिमा झाली होती, त्यानंतर ३१ मे रोजी दुसरी पौर्णिमा येत असल्याने हा दुर्मिळ योग जुळून आला आहे.

अशा प्रकारची घटना वारंवार घडत नसून साधारणपणे अडीच वर्षांच्या अंतराने (सुमारे ३० महिन्यांनी) एकदा पाहायला मिळते. खगोल अभ्यासकांच्या मते, फेब्रुवारी महिन्यात दिवसांची संख्या कमी असल्यामुळे त्या महिन्यात दोन पौर्णिमा येऊ शकत नाहीत, मात्र इतर महिन्यांमध्ये हा योग जुळण्याची शक्यता असते. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये अशा प्रकारचा ‘ब्लू मून’ पाहायला मिळाला होता. आता पुढील असा योग डिसेंबर २०२८ मध्ये येणार आहे. खगोल तज्ज्ञांनी या घटनेबाबत कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले असून नागरिकांनी या दुर्मिळ दृश्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आनंद घ्यावा, असे म्हटले आहे.

‘ब्लू मून’चा योग म्हणजे काय?

  • एकाच महिन्यात येणारी दुसरी पौर्णिमा.
  • चंद्राचा रंग प्रत्यक्षात निळा नसतो.
  • साधारणपणे ३० महिन्यांनी एकदा हा योग येतो.
  • यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये अशी घटना घडली होती.
  • पुढील ‘ब्लू मून’ डिसेंबर २०२८ मध्ये दिसणार आहे.
  • हा केवळ खगोलीय योग असून अंधश्रद्धेशी याचा संबंध नाही.

COMMENTS