सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील म्हसवे गावाजवळ रविवारी पहाटे टेम्पो ट्रॅव्हलरची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ज

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील म्हसवे गावाजवळ रविवारी पहाटे टेम्पो ट्रॅव्हलरची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोराची धडक बसून, दोन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही वाहन चालकांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या पुण्याच्या दिशेने जाणार्या लेन क्रमांक 3 वर बापू मोटर्स या शोरूमसमोर रविवारी पहाटे पार्किंग लाईट न लावता ट्रक रस्त्यावर उभा करण्यात आला होता.
या ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलरने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हरलमधील एकनाथ बापू कांबळे (वय 75) आणि स्नेहल उत्तम कांबळे (वय 16, दोघे रा. कसबा आरळे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला, तर दीपक नामदेव कांबळे (वय 34), मधुकर बापू कांबळे (वय 59), आशा मधुकर कांबळे (वय 50) आणि अन्य दोन जण जखमी झाले.
या प्रकरणी उत्तम एकनाथ कांबळे (वय 42, रा. कसबा आरळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक बालाजी लक्ष्मण घाटे (वय 25, रा. वडकी, ता. हवेली, जि. पुणे) आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक संदीप एकनाथ पाटील (वय 40, रा. मांढरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने जखमींना वैद्यकीय मदत न करता आणि पोलिसांना माहिती न देता पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर तपास करत आहेत.

COMMENTS