Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभवामि युगे युगे नृत्याविष्काराने नांदेडकर मंत्रमुग्ध

नांदेड : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित भगवान श्री परशुराम तेजोत्सव कार्यक्रमात अध्यात्म, संस्कृती आणि कलात्मकतेचा अद्वितीय संगम अनुभवा

मानवतेला काळीमा फासणारी घटना, आजच्या निषेध निदर्शनामध्ये सहभागी व्हावे- निखिल लातूरकर
नसरापूर अत्याचार प्रकरण: राज्यभर संतापाची लाट; आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
परशुराम जयंतीच्या पूर्वी परशुराम चौकाचे सुशोभीकरण करा; महापालिका आयुक्तांनी तातडीने लक्ष द्यावे

नांदेड : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित भगवान श्री परशुराम तेजोत्सव कार्यक्रमात अध्यात्म, संस्कृती आणि कलात्मकतेचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला. संभवामि युगे युगे या नाट्याविष्कारातून नाशिक येथील नृत्याली भरतनाट्यम अकादमीच्या प्रमुख गुरु सोनाली करंदीकर आणि त्यांच्या तीस शिष्यांनी सादर केलेल्या भव्य नृत्यप्रस्तुतीने उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
सादरीकरणानंतर गुरु सोनाली करंदीकर यांचा नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, आमदार बालाजी कल्याणकर, महामंडलेश्वर सुधीरदास महंत, प्रवचनकार अतुलशास्त्री भगरे गुरुजी, कार्यक्रमाचे संयोजक निखिल लातूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भगवद्गीतेतील अठरा अध्यायांतील महत्त्वपूर्ण संदेश, जीवनदर्शन आणि कथानक यांचे प्रभावी दर्शन या नृत्याविष्कारातून घडविण्यात आले. श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, धर्म-अधर्माचा संघर्ष, कर्तव्यनिष्ठा, आत्मज्ञान, निष्काम कर्मयोग, मन-बुद्धी-अहंकार यांतील संघर्ष, तसेच मानवकल्याणाचा सार्वकालिक संदेश नृत्य, अभिनय, संगीत आणि भावमुद्रांच्या माध्यमातून जिवंत करण्यात आला. अर्जुनाची युद्धभूमीवरील व्याकुळता, स्वधर्माची जाणीव, आसक्तीचा त्याग, कर्मयोगाची श्रेष्ठता आणि मोक्षमार्गाची दिशा यांचे दृश्यरूप सादरीकरण अत्यंत परिणामकारक ठरले. प्रत्यक्ष जीवन जगण्याचे शास्त्र म्हणजे भगवद्गीता आहे हे नांदेडकरांना या सांस्कृतिक प्रस्तुती मधून उमगले. या सादरीकरणात वय वर्षे आठपासून पुढील सर्व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवित आपल्या प्रतिभेचा विलक्षण आविष्कार घडविला. लहान वय असूनही त्यांच्या हालचालीतील नेमकेपणा, तालबद्धता, प्रसंगानुरूप देहबोली आणि आध्यात्मिक प्रसंगांचे भावपूर्ण सादरीकरण विशेष दाद मिळवून गेले. त्यांच्या चेहर्‍यावरील भावछटा, प्रसंगानुसार बदलणारी मनःस्थिती आणि पात्रांशी एकरूप होऊन केलेले अभिनयमय नृत्य हे संपूर्ण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. विशेषतः युद्धभूमीवरील अर्जुनाची मानसिक घालमेल, श्रीकृष्णांचे शांत आणि तेजस्वी मार्गदर्शन, कामातून क्रोध, क्रोधातून संमोह आणि शेवटी विनाश या गीतेतील मानसिक शृंखलेचे दर्शन, तसेच कर्मण्येवाधिकारस्ते या संदेशाचे सादरीकरण प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेले. काही प्रसंगांमध्ये सभागृहात दाटलेली शांतता आणि त्यानंतर उसळलेला टाळ्यांचा कडकडाट कलाकारांच्या प्रभावी अभिव्यक्तीची साक्ष देत होता. गुरु सोनाली करंदीकर यांनी आपल्या शिष्यांना दिलेल्या कसदार प्रशिक्षणाची प्रचिती प्रत्येक दृश्यातून जाणवत होती. नेत्रदीपक वेशभूषा, शिस्तबद्ध समूहरचना, प्रकाशयोजना, संगीताचा प्रभावी वापर आणि आध्यात्मिक आशयाची कलात्मक मांडणी यामुळे हा कार्यक्रम केवळ नृत्याविष्कार न राहता एक दिव्य अनुभूती ठरला. भारतीय संस्कृती, धर्मज्ञान आणि जीवनमूल्यांचा प्रभावी जागर घडविणारा हा नृत्याविष्कार तेजोत्सवातील अविस्मरणीय पर्व ठरला. उपस्थित मान्यवर व रसिकांनी उभे राहून कलाकारांचे कौतुक केले.

COMMENTS