Homeताज्या बातम्या

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी सुधीर डागा

कोपरगाव शहर : कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा बालाजी सुपर मार्केटचे संस्थापक सुधीर डागा यांची 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंड

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; कारेगव्हाण जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवात सीईओ जितिन रहमान यांचे प्रतिपादन
ऑपरेशन ‘क्रॅक डाऊन’ अंतर्गत अर्धापूर-मुदखेड पोलिसांची मोठी कारवाई; ३५ गोवंश जनावरे जप्त, ४ आरोपींवर गुन्हे दाखल
आधार व्यसनमुक्ती केंद्रात अहिल्याबाई होळकर जयंती व जागतिक तंबाखूमुक्त दिन उत्साहात साजरा

कोपरगाव शहर : कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा बालाजी सुपर मार्केटचे संस्थापक सुधीर डागा यांची ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर’च्या गव्हर्निंग कौन्सिलवर (शासकीय मंडळ) सदस्य म्हणून निवड झाली आहे. या निवडीमुळे कोपरगाव तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यापारी वर्गात कमालीचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती महासंघाचे सचिव प्रदीप साखरे यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी सांगलीचे उद्योजक रवींद्र मानगावे, तर उपाध्यक्षपदी महेंद्र अग्रवाल (धुळे) आणि वरिष्ठ उपाध्यक्षपदी कमलाकर शेट्टी यांची निवड झाली आहे.

या संदर्भातील अधिक माहिती देताना व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अजित लोहाडे म्हणाले की, सुमारे चाळीस वर्षांपूर्वी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची देखील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समध्ये गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली होती. त्यांनी या पदावर कार्यरत राहून कोपरगावच्या व्यापारी वर्गाचे यशस्वी प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर तब्बल चार दशकांनंतर कोपरगावसारख्या ग्रामीण भागातील व्यापाऱ्याला या प्रतिष्ठित संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीमुळे स्थानिक व्यापार क्षेत्राला राज्यस्तरावर एक प्रभावी व्यासपीठ मिळणार असून, व्यापाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

सुधीर डागा यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशन तसेच विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.

“सुधीर डागा यांच्या निवडीमुळे कोपरगावसारख्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची एकजूट करून जिल्ह्याचे नाव राज्यभर उंचावावे, हीच सदिच्छा. तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र मानगावे यांचा तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने लवकरच सत्कार आयोजित करण्यात येणार आहे. ‘गाव तेथे उद्योजक’ या उपक्रमांतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नवीन उद्योजक घडविण्याचा आमचा संकल्प आहे.” – ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे (अध्यक्ष, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ)

COMMENTS