चेन्नई : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असून, सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे नेते जो

चेन्नई : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असून, सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे नेते जोसेफ विजय यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा सादर केला आहे. मात्र बहुमतासाठी आवश्यक संख्याबळाचे ठोस पुरावे सादर करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर विजय यांच्यावर भाजपकडून दबाव आणला जात असल्याच्या चर्चांना भाजपने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नारायणन तिरुपती यांनी राज्यपालांचा निर्णय पूर्णपणे घटनात्मक चौकटीत असल्याचे सांगितले. तिरुपती म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी आवश्यक आकडा सिद्ध करणे टीव्हीकेसमोर मोठे आव्हान आहे. त्यांनी बहुमत सिद्ध केले तर राज्यपाल त्यांचा दावा स्वीकारतील आणि त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विजय यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी देशात लोकशाही पद्धतीने निवडणुका पार पडतात आणि सर्व प्रक्रिया संविधानानुसारच होतात, असे सांगितले. कोणत्याही पक्षावर दबाव आणण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, तमिळनाडूतील २३४ जागांपैकी टीव्हीकेने १०८ जागांवर विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधले आहे. मात्र सत्तास्थापनेसाठी आवश्यक ११८ आमदारांचा आकडा गाठण्यासाठी पक्षाला आणखी पाठिंब्याची गरज आहे. काँग्रेसने समर्थन जाहीर केल्यानंतर विजय यांच्या गटाची संख्या ११३ वर पोहोचली असली तरी अजून काही आमदारांची साथ आवश्यक आहे. टीव्हीकेकडून विदुथलाई चिरुथैगल काची आणि डाव्या पक्षांशीही चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय विजय हे दोन मतदारसंघांतून विजयी झाल्याने त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे पुढील काळात संख्याबळाचे गणित अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. जोसेफ विजय यांनी दोन वेळा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र इतर पक्षांच्या पाठिंब्याची पत्रे आणि आवश्यक आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेली कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिल्याचे समोर आले आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर ते स्थिर राहावे आणि लगेचच संकटात येऊ नये, यासाठीच ही खबरदारी घेतली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

COMMENTS