किनवट : शासनाची पूर्वपरवानगी न घेता कोठारी (चि) ऐवजी गोकुंदा येथे अनाधिकृतपणे शाळा चालवणार्या ’शांतीनिकेतन पब्लिक स्कूल’वर किनवट शिक्षण विभागाने

किनवट : शासनाची पूर्वपरवानगी न घेता कोठारी (चि) ऐवजी गोकुंदा येथे अनाधिकृतपणे शाळा चालवणार्या ’शांतीनिकेतन पब्लिक स्कूल’वर किनवट शिक्षण विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षण विभागाने जाहीर प्रगटन लावून पालकांना सावध केले असून, नियमांचे उल्लंघन केल्यास शाळेचा ’युडायस’ क्रमांक निलंबित करण्याचा इशारा दिला आहे.
रयत प्रतिष्ठान, देगलूर या संस्थेला ’शांतीनिकेतन पब्लिक स्कूल’ (इंग्रजी माध्यम) सुरू करण्यासाठी कोठारी (चिखली) येथे शासन मान्यता मिळाली होती. मात्र, संस्थेने नियमांचे उल्लंघन करत कोठारीऐवजी गोकुंदा येथे शाळा सुरू केली. या प्रकाराची तक्रार युवासेनेचे विधानसभा प्रमुख दयाभाऊ पाटील यांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे केली होती. तक्रारीची दखल घेत गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना फुटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कार्यवाही केली. शनिवारपेठ आणि गोकुंदा केंद्राच्या प्रमुखांनी शाळेवर जाऊन प्रवेशद्वारावर जाहीर सूचना फलक लावले आहेत. शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, संबंधित शाळेकडे कोठारी (चि) येथीलच मान्यता आहे. स्थलांतराची अधिकृत परवानगी न घेतल्याने गोकुंदा येथील शाळा पूर्णपणे अनाधिकृत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश या शाळेत घेऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शाळा व्यवस्थापनाला तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून, या काळात शाळा पुन्हा कोठारी (चिखली) येथे सुरू न केल्यास, संबंधित शाळेचा युडायस क्रमांक कायमचा निलंबित करून ’बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-2009’ नुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रही मुख्याध्यापकांना बजावण्यात आले आहे.

COMMENTS