Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन; नागरी प्रश्नांवर नागरिकांचा संताप

श्रीगोंदा : शहरातील प्रलंबित नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सतीश बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून (दि. १५ एप्रिल) श्रीगोंदा

नसरापूर दुर्घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये कॅण्डल मार्च
भोंदू बाबा खरात हा फडणवीस सरकारचाच माणूस!
महावितरणच्या ’शॉक’मुळे किनवटकर हैराण; शहर अंधारात, जनआंदोलनाचा इशारा!

श्रीगोंदा : शहरातील प्रलंबित नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सतीश बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून (दि. १५ एप्रिल) श्रीगोंदा नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील अनेक महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधत आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये शनी चौक ते जोधपूर मारुती चौक रस्त्यावरील गटार लाईन व रस्त्याची कामे तात्काळ पूर्ण करणे, शहरातील धूळ, कचरा व साचलेल्या पाण्याच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करणे, तसेच नगरपालिकेकडून माहिती मागूनही मिळणाऱ्या अपुऱ्या प्रतिसादाबाबत टाळाटाळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच नगरपरिषद सभांचे थेट प्रक्षेपण फेसबुक व यूट्यूबवर सुरू करावे, रस्त्यालगत टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, सरस्वती नदी परिसर स्वच्छ करून पर्यावरण संरक्षणासाठी पावले उचलावीत, शाळांसाठी मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून इमारतींची कामे पूर्ण करावीत, तसेच अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंगवर कारवाई करावी, अशा मागण्यांचाही समावेश आहे.

या सर्व मागण्यांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न झाल्याने अखेर ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या आंदोलनाला शिंदे गटातील नगरसेवकांनी जाहीर पाठिंबा दिल्याने आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. नागरिक व लोकप्रतिनिधी एकत्र आल्याने प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन प्रश्न सोडवले नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे श्रीगोंदा शहरातील नागरी समस्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

COMMENTS