परळी वै.: परळी वैजनाथ पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवकांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला असून त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील नागरिकांच्या दै

परळी वै.: परळी वैजनाथ पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवकांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला असून त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन कामांवर होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवकांची एकूण 62 पदे मंजूर असताना केवळ 51 ग्रामसेवक कार्यरत असून तब्बल 11 पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक ग्रामसेवकांवर अतिरिक्त गावांचा कारभार सोपविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अनेक ग्रामसेवकांकडे त्यांच्या मूळ कार्यक्षेत्रासोबत आणखी 3 ते 4 गावांचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला असून प्रशासनावर त्याचा परिणाम होत आहे. विशेष म्हणजे अनेक ग्रामसेवक हे दररोज 100 ते 160 किलोमीटर अंतरावरून ये-जा करत असल्याचे सांगितले जात आहे. शासनाच्या नियमांनुसार ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या आदेशाचे पालन होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील विविध कामांमध्ये विलंब होत आहे. रहिवासी दाखला, पीटीआर नक्कल, जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, हयात दाखला तसेच विविध शासकीय कागदपत्रांसाठी ग्रामस्थांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अतिरिक्त कार्यभारामुळे काही ठिकाणी आर्थिक मागण्यांचे प्रकार वाढत असल्याचे आरोपही नागरिकांकडून केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी एका ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना चर्चेत आली होती. संबंधित ग्रामसेवकाकडेही अतिरिक्त गावांचा कार्यभार असल्याची चर्चा होती. ग्रामीण भागातील प्रशासन सुरळीत ठेवण्यासाठी रिक्त ग्रामसेवक पदे तातडीने भरावीत तसेच ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश काटेकोरपणे लागू करावेत, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे.

COMMENTS