नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेच्या केंद्राभोवती कोण फिरत आहे आणि कोण कोणापासून अंतर राखत आहे, याला नेहमीच मोठे राजकीय महत्त्व असते.

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेच्या केंद्राभोवती कोण फिरत आहे आणि कोण कोणापासून अंतर राखत आहे, याला नेहमीच मोठे राजकीय महत्त्व असते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या आठ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत घेतलेली भेट ही केवळ विकासकामांच्या मागण्यांसाठीची बैठक म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. मतदारसंघातील प्रश्न, पाणीटंचाई, शेतकरी, विद्यार्थी आणि इतर लोकहिताच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. ही भेट लपूनछपून नव्हे, तर उघडपणे होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत सुप्रिया सुळे यांची केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या भेटींची मालिका लक्षात घेतली, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची सत्ताधाऱ्यांशी वाढत चाललेली जवळीक हा चर्चेचा विषय ठरणे स्वाभाविक आहे. एका बाजूला महाविकास आघाडीतील विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या धोरणांवर टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला केंद्रातील सत्तेच्या सर्वोच्च नेतृत्वाशी सातत्याने संवाद साधायचा, या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी नाहीत. परंतु, त्या दोन्हीच्या राजकीय संदेशाचा विचार करणे आवश्यक आहे. लोकशाहीत विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांशी संवाद साधणे गैर नाही, उलट जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारशी संवाद साधणे ही विरोधकांची जबाबदारीच आहे.
मात्र, प्रश्न एवढाच आहे की, हा संवाद केवळ लोकहितापुरता मर्यादित आहे की त्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणांची चाहूल आहे? कारण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण सध्या अत्यंत गुंतागुंतीच्या वळणावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एक गट सत्तेत सहभागी झाला, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट विरोधी बाकांवर राहिला. अशा परिस्थितीत शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांचा केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी वाढता संवाद राजकीय कुतूहल निर्माण करणारा ठरतो.
अल्प कालावधीत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या भेटींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रश्नावर चर्चा, त्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पंतप्रधानांशी भेट, पुन्हा अमित शाह यांच्याशी चर्चा आणि आता पुन्हा पंतप्रधानांची भेट – या घटनांची मालिका राजकीय निरीक्षकांना विचार करायला भाग पाडते.
महाराष्ट्रातील मतदार आता राजकीय हालचाली बारकाईने पाहत आहेत. शरद पवार यांच्या राजकारणाची सर्वात मोठी ताकद म्हणजे परिस्थितीनुसार संवादाची क्षमता. परंतु आजचे राजकारण पूर्वीपेक्षा अधिक पारदर्शक झाले आहे. त्यामुळे ‘उघडपणे भेटतो’ हा युक्तिवाद पुरेसा नाही; या भेटींचे राजकीय परिणाम आणि त्यानंतरच्या भूमिकांचे उत्तर जनतेला द्यावे लागेल.
शरद पवार गटाची सत्ताधाऱ्यांशी वाढती जवळीक ही सध्या निश्चित राजकीय युतीचे लक्षण आहे असे म्हणणे घाईचे ठरेल, पण ही जवळीक केवळ योगायोगांची मालिका आहे असे म्हणणेही तितकेच धाडसाचे ठरेल. सत्तेच्या केंद्राशी वाढणारा संवाद आणि राज्यातील विरोधी राजकारण यांचा मेळ शरद पवार गटाला किती साधता येतो, यावरच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची विश्वासार्हता ठरणार आहे.

COMMENTS