श्रीधर अंभोरे : शब्दांना दृष्यभाषा देणारा रेखाकार!

Homeताज्या बातम्या

श्रीधर अंभोरे : शब्दांना दृष्यभाषा देणारा रेखाकार!

श्रीधर अंभोरे यांच्या निधनाची बातमी वेदनादायी आहे. त्यांच्या कलेविषयी उपलब्ध लेखन, त्यांच्या स्वतःच्या आठवणी आणि त्यांच्या रेखाचित्रांचा साहित्या

कराड पालिकेकडून वसुली विभागाचा कारवाईचा धडाका
सातारा जिल्ह्यात उसळली दंगल
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेता शैलेश लोढा यांना पितृशोक
The current image has no alternative text. The file name is: dakhal-2-1-1-1.png

श्रीधर अंभोरे यांच्या निधनाची बातमी वेदनादायी आहे. त्यांच्या कलेविषयी उपलब्ध लेखन, त्यांच्या स्वतःच्या आठवणी आणि त्यांच्या रेखाचित्रांचा साहित्याशी असलेला संबंध लक्षात घेता, त्यांना केवळ ‘चित्रकार’ म्हणून स्मरण करणे त्यांच्या कार्याची व्याप्ती कमी करून पाहणे ठरेल. त्यांनी मराठी साहित्याच्या, विशेषतः दलित साहित्याच्या, शब्दांना एक दृश्यभाषा दिली. त्यांच्या रेषांनी अनेक पुस्तकांच्या आशयाला चेहरा दिला; आणि कधी कधी त्या चेहऱ्याला चेहराच नव्हता—फक्त एक अस्वस्थ करणारी रेषा होती.

काही माणसे आपल्या क्षेत्रात काम करतात आणि काळाच्या ओघात त्यांची कामे इतिहासाचा भाग बनतात. काही माणसे मात्र आपल्या क्षेत्राचीच भाषा बदलून टाकतात. श्रीधर अंभोरे हे या दुसऱ्या प्रकारात मोडणारे कलावंत होते. त्यांच्या निधनाने केवळ एक चित्रकार गेला असे म्हणणे म्हणूनच अपुरे आहे. मराठी साहित्याच्या विशेषतः दलित, आदिवासी आणि उपेक्षितांच्या साहित्यविश्वाला आपल्या रेषांमधून दृश्य संवेदना देणारा एक महत्त्वाचा कलावंत आज आपल्यातून निघून गेला आहे. अंभोरे यांच्या रेखाचित्रांची शैली पहिल्या नजरेत साधी वाटते; पण ती साधेपणाची नव्हती. त्यांच्या रेषेमागे दीर्घ रियाज, निरीक्षण, अंतर्मुखता आणि समाजजीवनाचे सूक्ष्म भान होते. त्यांनी रंग-रेषांचे कोणतेही पारंपरिक पठडीतले शिक्षण घेतले नव्हते, असे त्यांच्या विषयीच्या लेखनातून दिसते. पण कलावंताला केवळ संस्थात्मक शिक्षणातून कला मिळत नाही; कधी कधी जगणेच त्याची सर्वात मोठी कलाशाळा ठरते. अंभोरे यांच्या बाबतीत हे अगदी तंतोतंत घडले. 

          त्यांच्या कलेचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे रेषेवर असलेला त्यांचा विलक्षण विश्वास. रंगांचा भपका, दृश्यांचा आडंबर किंवा अलंकारिक सजावट यापेक्षा रेषेच्या माध्यमातून आशय व्यक्त करण्यावर त्यांचा भर होता. काळा-पांढरा अवकाश, झाडे, दगड, पक्षी, पशू, मानवी आकृती, वास्तू आणि चेहराविहीन माणसे या सगळ्यांतून त्यांनी एक स्वतंत्र चित्रविश्व उभे केले. त्यांच्या चित्रांतील माणसांना अनेकदा चेहरे नसतात; पण म्हणून ती माणसे अनोळखी होत नाहीत. उलट चेहरा नसल्यामुळे ती अधिक व्यापक होतात. त्यात एखादा विशिष्ट माणूस राहत नाही; त्यात समाजातील असंख्य माणसे सामावून जातात.

           महावीर जोंधळे यांनी त्यांच्या चित्रशैलीचे केलेले वाचन याच कारणामुळे महत्त्वाचे ठरते. अंभोरे यांच्या चित्रांत समाज-संस्कृती, विचार, लोकभावना, भूमिनिष्ठा, निसर्गाकार, लयबद्धता आणि मानवी अनुभव यांचे संदर्भ एकत्र येतात. त्यांच्या चित्ररेषेचे नाते आदिमतेशी जोडले गेलेले दिसते. पिंपळवृक्ष, पिंपळपाने, पक्ष्यांचे थवे, दगड, झाडे आणि अवकाश यांना त्यांच्या चित्रांमध्ये केवळ सजावटीचे स्थान नसते; ते एका खोल सांस्कृतिक स्मृतीचे वाहक बनतात. पण श्रीधर अंभोरे यांच्या कलेचे खरे मोठेपण समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या मुखपृष्ठकलेचा विचार करावा लागेल. पुस्तकाचे मुखपृष्ठ म्हणजे पुस्तकाच्या आशयाचे केवळ बाह्य आवरण नाही. ते पुस्तक वाचण्यापूर्वी वाचकाला मिळणारा पहिला संकेत असतो. लेखक शब्दांतून जे सांगतो, त्याची पहिली दृश्यभेट चित्रकार घडवतो. मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठाच्या इतिहासात दीनानाथ दलाल, सुभाष अवचट, चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याबरोबर श्रीधर अंभोरे यांचे नाव आदराने घ्यावे लागते अंभोरे यांच्याबाबत सर्वांत विलक्षण गोष्ट म्हणजे कवीच्या किंवा लेखकाच्या लिखाणाचा गाभा चित्रात पकडण्याची त्यांची क्षमता. हे ऐकायला विरोधाभासी वाटते. कारण आपण सामान्यतः असे गृहीत धरतो की पुस्तक वाचले, त्याचा आशय समजून घेतला, लेखकाच्या भावविश्वात शिरलो आणि मग मुखपृष्ठ काढले की चांगले मुखपृष्ठ तयार होते. अंभोरे यांची प्रक्रिया मात्र अधिक गुंतागुंतीची होती. ते केवळ शब्द वाचत नसत; ते लेखकाचा स्वभाव, त्याची भाषा, त्याच्या जगण्याची पार्श्वभूमी, त्याच्या संवेदना आणि पुस्तकाच्या शीर्षकाभोवती निर्माण होणारी प्रतिमा यांचे आकलन करत. त्यांनी स्वतःच सांगितले आहे की त्यांचे वाचन चौफेर होते आणि साहित्याचा दर्जा, आशय, विषय आणि त्याचा पोत ते चित्राचा विचार करतानाच जाणून घेत. 

दलित साहित्याच्या संदर्भात मात्र त्यांचा अनुभव आणखी वेगळा होता. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी दलित साहित्याचा जो प्रचंड स्फोट झाला, त्यातील अनुभवसिद्ध लेखन, बोलीभाषेतील शब्द, जगण्यातील कडवटपणा, विद्रोह आणि सामाजिक वास्तव यांनी अंभोरे यांच्या मनाला अस्वस्थ केले. त्यांनी स्वतःच्या अनुभवाचे वर्णन करताना सांगितले आहे की असे साहित्य वाचल्यानंतर चित्राला आकार देताना त्यांचे डोके अक्षरशः भिरभिरत असे. लिखाणाचा पसारा इतका मोठा आणि अनुभव इतका तीव्र असे की त्याचा ‘गाभा’ पकडणे हीच एक स्वतंत्र कलात्मक समस्या बनत असे. मग ते थांबत. आणि त्या लिखाणाने त्यांच्या स्वतःच्या अनुभवांच्या दारावर टकटक केली की अचानक मुखपृष्ठाचा आकार जन्म घेत असे. 

        दलित साहित्याच्या निर्मितीच्या काळात मराठी साहित्यात एक नवे वास्तव प्रवेश करत होते. गावकुसाबाहेरचे जग, अस्पृश्यतेचा अनुभव, जातीय अपमान, श्रम, भूक, हिंसा, लैंगिकता, दारिद्र्य, विद्रोह, आत्मसन्मान आणि मानवी प्रतिष्ठेचा संघर्ष हे सगळे साहित्याच्या केंद्रस्थानी येत होते. त्या साहित्याला पारंपरिक सौंदर्यशास्त्राच्या चौकटीत मावणे शक्य नव्हते. त्यासाठी नव्या सौंदर्यदृष्टीची गरज होती. येथे श्रीधर अंभोरे यांची रेषा महत्त्वाची ठरते.

त्यांच्या रेषेत गुळगुळीतपणा नाही. ती कधी तुटते, कधी वळते, कधी दाट होते, कधी मोकळ्या अवकाशात हरवते. ती निसर्गाच्या आकारांतून जाते आणि माणसाच्या दुःखापाशी येऊन थांबते. त्यांच्या चित्रांत दगड हा केवळ दगड नसतो; झाड केवळ झाड नसते; पक्षी केवळ पक्षी नसतो. प्रत्येक प्रतिमा काहीतरी सामाजिक, सांस्कृतिक किंवा मानसिक अर्थ घेऊन येते.

          त्यांच्या कलेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली. अनेक चित्रकारांवर एखाद्या शैलीचा प्रभाव असतो. अंभोरे यांच्या बाबतीत मात्र त्यांच्या रेषेला स्वतंत्र ओळख मिळाली. इतकी की त्यांच्या चित्राकडे पाहून ‘ही अंभोरेरेषा आहे’ असे म्हणता येऊ लागले. त्यांच्या चित्रांविषयी ‘श्रीधररेषा’ नावाचे स्वतंत्र पुस्तक निर्माण होणे हे त्याचेच प्रतीक आहे. महावीर जोंधळे यांनी त्यांच्या चित्रांचा अभ्यास करताना ‘साधनं कमी आणि साधना जास्त’ या शब्दांत त्यांच्या कलेचे सार पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

COMMENTS