छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांना मोठा राजकीय धक्

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांच्या पुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद करण्यात आला. त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या तथा कन्नडच्या आमदार संजना जाधव यांचाही अर्ज अपात्र ठरल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी सोमवारी उशिरापर्यंत सुरू होती. या प्रक्रियेदरम्यान अनेक अर्जांवर हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार संजना जाधव, रमेश बोरनारे आणि समीर सत्तार यांच्यासह एकूण चौदा उमेदवारांच्या अर्जांबाबत आक्षेप घेण्यात आले होते. संबंधित हरकतींवरील सुनावणीनंतर निवडणूक अधिकार्यांनी अंतिम निर्णय जाहीर केला. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून राजकीय वातावरण तापले होते. विविध पक्षांतील मंत्री, आमदार, खासदार तसेच प्रभावी सहकारी नेत्यांच्या कुटुंबीयांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. संचालकपदासाठी एकूण 214 अर्ज प्राप्त झाले होते. मात्र छाननी प्रक्रियेनंतर काही महत्त्वाच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मराठवाड्यातील प्रभावी आर्थिक संस्था मानली जाते. शेकडो कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, जिल्हाभर पसरलेले शाखांचे जाळे आणि हजारो कोटी रुपयांच्या ठेवी यामुळे या बँकेवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध राजकीय गटांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. मागील निवडणुकीत या बँकेचे नेतृत्व प्रथमच काँग्रेसबाह्य गटाकडे गेले होते. त्यावेळी अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखालील गटाने सत्ता मिळवली होती. मात्र गेल्या काही वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात आपला प्रभाव वाढविला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील या महत्त्वाच्या संस्थेवरही वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. समीर सत्तार यांचा अर्ज बाद झाल्याने आगामी निवडणुकीतील काही राजकीय अडथळे दूर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळासाठी मतदान 8 जुलै रोजी होणार असून निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
तब्बल 45 उमेदवारी अर्ज अवैध ठरले
700 कोटींची उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर आले आहेत. मनपा, जिल्हा परिषद गमावल्यानंतर शिवसेनेने निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. याच कारणामुळे पालकमंत्री शिरसाट रिंगणात उतरले आहेत. मात्र, भाजपच्या पदाधिकार्यांनी त्यांच्यासह नगरसेविका हर्षदा शिरसाट यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्याने महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष पेटल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया नुकतीच पार पडली. या छाननीमध्ये एकूण 45 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. यामध्ये आमदार संजना जाधव, अब्दुल समीर सत्तार आणि माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्या अर्जांचा समावेश आहे.

COMMENTS