Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवीन विद्युत उपकेंद्र व ट्रान्सफॉर्मर उभारून विजेच्या समस्या प्राधान्याने सोडवा

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली महावितरण कंपनीच्या बैठकीत मागणी

कोपरगाव प्रतिनिधी ःकोपरगाव तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघातील विजेच्या समस्या प्राधान्याने सोडवून पूर्ण क्षमतेने सुरळीत वीजपुरवठा करावा. त्यासाठी आव

दारुसाठी पैसे न दिल्याने मारहाण
दुकानासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी
तळेगाव दिघेमध्ये फोडले बँकेचे एटीएम

कोपरगाव प्रतिनिधी ःकोपरगाव तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघातील विजेच्या समस्या प्राधान्याने सोडवून पूर्ण क्षमतेने सुरळीत वीजपुरवठा करावा. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी नवीन 33 के.व्ही. विद्युत उपकेंद्र उभारावेत, ओव्हरलोड असलेल्या व वारंवार जळणार्‍या ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावेत. अशा मागण्या संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी महावितरण कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे व नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्याकडे केल्या.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण (महावितरण) कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे व नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना येथे नाशिक परिमंडळातील प्रमुख अधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महावितरण कंपनीचे अहमदनगर परिमंडळाचे अधिक्षक अभियंता प्रकाश खांडेकर, संगमनेरचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, कोपरगाव ग्रामीण विभागाचे उपकार्यकारी अभियंता एल. एस. राठोड व इतर अधिकारी उपस्थित होते.

बिपीन कोल्हे यांनी कोपरगाव विजेच्या समस्यांबाबत चंद्रकांत डांगे व दीपक कुमठेकर यांच्याशी चर्चा करून मतदारसंघातील विविध प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करून ग्राहकांना पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा करावा. अशी आग्रही मागणी केली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकर्‍यांना नेहमीच विजेची समस्या भेडसावत असून, त्यादृष्टीने शेतकर्‍यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघात ही योजना प्राधान्याने राबविणे गरजेचे असल्याचे बिपीन कोल्हे यांनी सांगितले.कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाले आहेत. या ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मरमुळे कृषिपंप व्यवस्थित चालत नाहीत. त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पाऊस नसल्याने आधीच शेतकरी हवालदिल झालेले असताना आता भारनियमनाच्या नावाखाली विजेचा सतत लपंडाव सुरू आहे. अगोदरच शेतकर्‍यांच्या जीविताला वन्य प्राण्यांपासून धोका असताना रात्री-अपरात्री कधीही वीज गायब होत आहे. विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीने शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे ठरलेल्या वेळेत उच्च दाबाने सुरळीत वीजपुरवठा करावा. शेतीसाठी सलग आठ तास तरी अखंडित वीजपुरवठा करावा, जेणेकरून शेतकर्‍यांची अडचण होणार नाही, असे त्यांनी सांगितले.माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे सिन्नर तालुक्यातील शहा येथे 132 के.व्ही. विद्युत उपकेंद्र मंजूर होऊन ते कार्यान्वित झाले आहे. या उपकेंद्राला कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, पोहेगाव, चासनळी ही उपकेंद्रे जोडण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे या कामाला गती देऊन ते त्वरित पूर्ण करावे. कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी येथील विद्युत उपकेंद्राची क्षमता 3 एम.व्ही.ए. वरून 5 एम.व्ही.ए. इतकी वाढविण्यासाठी शासनाने 60 लाख रुपये मंजूर केले असून, हे काम त्वरित पूर्ण करावे. तसेच ब्राह्मणगाव व चांदेकसारे येथे नवीन 33/11 के. व्ही. विद्युत उपकेंद्रास मंजुरी मिळाली आहे. ब्राह्मणगावच्या विद्युत उपकेंद्राच्या कामाला गती देऊन हे कामही तात्काळ मार्गी लावावे. कोपरगाव मतदारसंघातील वीजविषयक समस्या व सर्व प्रलंबित कामे प्राधान्याने लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही डांगे व कुमठेकर यांनी यावेळी दिली.

COMMENTS