अहमदनगर मर्चंटस सहकारी बँकेला 13 लाखाचा दंड ; रिझव्ह्र बँकेने दिला आदेश, गैरव्यवस्थापनाचा ठपका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर मर्चंटस सहकारी बँकेला 13 लाखाचा दंड ; रिझव्ह्र बँकेने दिला आदेश, गैरव्यवस्थापनाचा ठपका

अहमदनगर/प्रतिनिधी-स्थापनेची 50 वर्षे पूर्ण करीत असलेली व नगरमधील नावाजलेली व्यापारी बँक म्हणून लौकिक मिळवून असलेल्या अहमदनगर मर्चंटस सहकारी बँकेला रि

वकीलांचा आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार
आज सत्ता आणि सरकार सांगेल तशी पत्रकारीता सुरू…
कोपरगाव नगरपरिषदेला ५ कोटी निधी द्या आ. आशुतोष काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी-स्थापनेची 50 वर्षे पूर्ण करीत असलेली व नगरमधील नावाजलेली व्यापारी बँक म्हणून लौकिक मिळवून असलेल्या अहमदनगर मर्चंटस सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने 13 लाख रुपयांचा दंड केला आहे. गैरव्यवस्थापन, 10 कोटी 25 लाखाच्या कर्जाचे बेकायदेशीर वितरण झाल्यानंतर ती बाब रिझर्व्ह बँकेपासून लपवून ठेवणे तसेच शैक्षणिक पात्रता नसलेल्या व्यक्तीस मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणे आदी कारणांवरून अहमदनगर मर्चंटस बँकेला 13 लाखाचा दंड झाल्याचे सांगण्यात येते.
रिझर्व्ह बँकेचे मुख्य प्रबंधक योगेश दयाल यांनी प्रसिद्धी पत्रक प्रकाशित केले असून, यात अहमदनगर मर्चंटस सहकारी बँकेला 13 लाख रुपयांचा दंड करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. बँकींग रेग्युलेशन अ‍ॅक्ट 1949 च्या कलम 46 (4) (आय) व कलम 56सह कलम 47 ए (1) (सी) यानुसार रिझर्व्ह बँकेला असलेल्या अधिकारानुसार या दंडात्मक कारवाईचा आदेश देण्यात आल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
31 मार्च 2019 रोजीच्या बँकेच्या आर्थिक स्थितीच्या तपासणीनंतर चुकीचे कर्जवाटप, गैर व्यवस्थापन, गैरनियुक्ती, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशांचे झाले नसलेले पालन आदींसह अन्य मुद्यांच्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेने अहमदनगर मर्चंटस बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीबाबत बँकेने केलेला खुलासा तसेच सुनावणीच्यावेळी तोंडी दिलेले स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने अमान्य केले असून, बँकेला आर्थिक दंड करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार 13 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत बँकेचे अध्यक्ष अनिल पोखरणा यांच्याशी संपर्क साधल्यावर, याबाबत आपल्याला काही माहीत नाही. आजारपणामुळे काही दिवसांपासून पुुण्यात उपचार घेत आहे व उपाध्यक्ष बायड यांच्याकडे अधिकार सुपूर्द केले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, बँकेशी संबंधित काही अधिकृत सूत्रांकडून बँकेला आर्थिक दंड झाल्याचे सांगण्यात आले. अहमदनगर मर्चंटस बँकेत घडलेल्या तब्बल सव्वा दहा कोटीच्या कर्ज घोटाळ्याची माहिती रिझर्व बँकेपासून लपविली म्हणून बँकेवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता होती. याबाबत बँकेला मागील जूनमध्येच 1 कोटी रुपये दंड का करण्यात येऊ नये, अशी नोटीस रिझर्व्ह बँकेने बजावली होती. त्यानुसार हा 13 लाखाचा दंड झाला आहे. दहा कोटीच्या बोगस कर्ज वितरणासह गैरव्यवस्थापन, मु़ख्य कार्यकारी अधिकारीपदी पात्रता नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती आदी मुद्यांवर हा दंड झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

संचालकांकडून वसूल करा
दहा कोटीचे बोगस कर्ज प्रकरण, गैरव्यवस्थापन व सुरेश कटारिया यांची पात्रता नसताना मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती या मुद्यांवर रिझर्व्ह बँकेने अहमदनगर मर्चंटस बँकेला 13 लाखाचा दंड केला आहे. हा दंड संचालक मंडळाकडून वसूल करून तो भरला जावा. बँकेचा एकही पैसा या दंडासाठी भरला जाऊ नये, पण तसे झाले नाही तर याविरोधात आम्ही रिझर्व्ह बँकेकडे व न्यायालयात दाद मागू, असा इशारा बँकेचे ज्येष्ठ संचालक राजेंद्र चोपडा यांनी दिला आहे. दरम्यान, बँकेच्या एका संचालकाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळवायचे असून, त्यासाठीही बँकेचा पैसा खर्च केला तर रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू, असा इशाराही त्यांनी दिला.

COMMENTS