शेवगाव : अल्पवयीन तरुणीला वारंवार मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फरार झालेल्या मुख्य आरोपीला शेवगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासा

शेवगाव : अल्पवयीन तरुणीला वारंवार मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फरार झालेल्या मुख्य आरोपीला शेवगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला सातारा जिल्ह्यातील वाई येथून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवगाव शहरातील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन पीडित तरुणीला संबंधित आरोपी फोनद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून वारंवार मानसिक त्रास देत होता. आरोपीकडून होत असलेल्या या सातत्यपूर्ण छळाला कंटाळून अखेर त्या अल्पवयीन मुलीने ११ जून २०२६ रोजी दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेनंतर पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा नोंद होताच आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता.
आरोपी अत्यंत चलाख असल्याने तो पोलिसांना चकवा देण्यासाठी सातत्याने आपले वास्तव्य बदलत होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. दरम्यान, शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुतकुळे यांना आरोपी सातारा जिल्ह्यात लपल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर तपास यंत्रणांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सातारा जिल्ह्यातील वाई येथे सापळा रचून आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेतले. ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुतकुळे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे करत आहेत.

COMMENTS