Homeताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासन आणि पोलीस विभाग एकवटलेनियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर होणार कठोर कारवाई; प्रत्येक शालेय बसमध्ये सीसीटीव्ही व महिला अटेंडंट अनिवार्य

शहरातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शालेय वाहतूक व्यवस्था आणि शाळांमधील सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाने सं

व्यवस्थेचा मांडलेला बाजार! शिक्षक पात्रता चाचणी पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी पुन्हा आंदोलन करणार; पेपर लीक प्रकरणावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला तीव्र संताप!
२२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! नीट परीक्षेच्या गोंधळावर वर्षा गायकवाडांचा तीव्र संताप



शहरातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शालेय वाहतूक व्यवस्था आणि शाळांमधील सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे महत्त्वाची पावले उचलली आहेत. यासाठी जिल्हा स्काऊट गाईड भवन येथे शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि संबंधित अधिकार्‍यांची विशेष बैठक पार पडली. बैठकीस शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
अलीकडेच शाळेच्या बसमधून उतरलेल्या एका विद्यार्थिनीला रस्ता ओलांडताना अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी शाळा प्रशासन, पालक आणि पोलीस विभाग यांनी समन्वयाने काम करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. बैठकीत प्रत्येक शालेय बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे अनिवार्य करण्यात आले. तसेच प्रत्येक बसमध्ये महिला अटेंडंटची नियुक्ती बंधनकारक राहील. बसमधून विद्यार्थी उतरल्यावर त्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यास मदत करणे, बसच्या पुढून न जाता मागील बाजूने जाण्याच्या सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आणि विद्यार्थ्यांवर सतत लक्ष ठेवणे, ही जबाबदारी संबंधित अटेंडंटवर असेल. शालेय वाहनांमध्ये कार्यरत असलेले चालक, महिला अटेंडंट तसेच इतर अशासकीय कर्मचार्‍यांची पोलीस चारित्र्य पडताळणी करणे प्रत्येक शाळेसाठी आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर सर्व शालेय वाहनांकडे आरटीओची वैध तपासणी, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, परवाने आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत असणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख यांनी यावेळी स्पष्ट इशारा देत सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमांचे पालन न करणार्‍या शालेय वाहनांवर, चालकांवर किंवा संबंधित संस्थांवर पोलीस विभाग आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व शाळांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी सांगितले. पालकांनाही आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांना केवळ अधिकृत परवानाधारक, सर्व कागदपत्रे पूर्ण असलेल्या आणि सुरक्षा निकषांची पूर्तता करणार्‍या वाहनांतूनच शाळेत पाठवावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले. मुख्य शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील यांनी शाळा प्रशासन, दामिनी पथक आणि स्थानिक पोलीस अधिकारी यांच्यात तात्काळ समन्वय साधण्यासाठी व्हॉट्सप ग्रुप तयार करण्याच्या सूचना दिल्या. कोणतीही आपत्कालीन घटना किंवा संशयास्पद बाब त्वरित संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचावी, यासाठी माहितीची जलद देवाणघेवाण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. याचबरोबर येत्या काळात राबविण्यात येणार्‍या ’कॉपीमुक्त अभियान’ संदर्भातही शाळांना सूचना देण्यात आल्या. परीक्षांमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि प्रामाणिकपणा राखण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करावी, विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे परीक्षा देण्यास प्रोत्साहित करावे आणि शाळांनी आवश्यक नियोजन आतापासूनच सुरू करावे, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नसून, शाळा प्रशासन, पालक आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरक्षित शालेय वातावरण निर्माण करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

COMMENTS