मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ नेते स्व. मधू दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास

मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ नेते स्व. मधू दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. केंद्राच्या अंतिम मान्यतेनंतर, आता सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे अधिकृत नाव ‘लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे होणार आहे.
स्व. मधू दंडवते यांनी कोकण रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात यावा यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी कोकणच्या रेल्वे प्रश्नांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच कोकण रेल्वे सुरू झाली, अशी कोकणवासीयांची भावना आहे. यामुळे सावंतवाडी रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती. या लोकभावनेची दखल घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून, याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृह व रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अतिक्रमण नियमित याच बैठकीत डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव-सोनारपाडा येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टचे अतिक्रमण नियमानुकूल करून चार एकर २५ गुंठे जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार सामाजिक कार्यासाठी ही जागा ट्रस्टच्या नावावर करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देशात सुरू असलेल्या जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार आता शासनाला ३० जून २०२६ पर्यंत बदली प्रक्रिया राबविता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सुधारणा करण्यात येणार असून, या मसुद्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.

COMMENTS