कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये कथित अवैध स्थलांतरितांविरोधात सुरू करण्यात आलेल्या कारवाईचा परिणाम आता सीमाभागात दिसून येत असल्याचा दावा भारतीय जनता
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये कथित अवैध स्थलांतरितांविरोधात सुरू करण्यात आलेल्या कारवाईचा परिणाम आता सीमाभागात दिसून येत असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हाकीमपूर सीमाक्षेत्रात मोठ्या संख्येने लोक बांगलादेशात परत जाण्यासाठी जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भातील काही दृश्यफिती (व्हिडिओ) समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत.
भाजपने केलेल्या दाव्यानुसार, राज्यात अवैध रीतीने वास्तव्य असलेल्या स्थलांतरितांविरोधात ओळख पटवून कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. ‘शोधा, नोंद रद्द करा आणि देशाबाहेर पाठवा’ या भूमिकेंतर्गत ही मोहीम सुरू असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. यानंतर सीमावर्ती भागांमध्ये हालचाली वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी विशेष पडताळणी प्रक्रियेच्या काळातही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती.
आता सीमावर्ती भागात पुन्हा लोक जमा होत असल्याने राज्यातील घुसखोरीचा मुद्दा एरणीवर आला आहे. भाजपने आरोप केला की, राज्यातील विविध भागांत अनेकजण दीर्घकाळ अवैध रीतीने राहत होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर अशा व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली. मालदा येथे कथित अवैध स्थलांतरितांसाठी तात्पुरते केंद्र (Detention Centre) उभारण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. या केंद्रात संबंधितांना ठेवून त्यानंतर त्यांना परत पाठविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

COMMENTS