नांदेड : स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संघटना, नांदेडच्या वतीने संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या 759 व्या जयंतीनिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी, श

नांदेड : स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संघटना, नांदेडच्या वतीने संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या 759 व्या जयंतीनिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी, शासकीय सेवेत रुजू झालेल्या युवक-युवती तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या समाजबांधवांच्या गुणगौरव सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी, संघटनशक्ती आणि समाजप्रबोधनाचा संगम ठरलेल्या या कार्यक्रमात हजारो समाजबांधव सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले स्मारक (आयटीआय) येथून श्रीकृष्ण मंगल कार्यालय, तरोडा या मार्गावर भव्य शोभायात्रेने झाली. संत गोरोबाकाका यांच्या जीवनकार्यावर आधारित देखावे, पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदंगाचा गजर आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय व उत्सवी वातावरणाने भारावून गेला. यानंतर आयोजित गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी, शासकीय सेवेत निवड झालेल्या युवक-युवती आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक अध्यक्ष विजयराव देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव विभूते व जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी गेल्या महिनाभर केलेल्या नियोजनबद्ध परिश्रमांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके-बोंढारकर यांनी समाजाच्या एकजुटीची दखल घेत संत शिरोमणी गोरोबाकाका मंदिराच्या सभामंडपाच्या उभारणीसाठी आमदार निधीतून 15 लाख रुपयांचा निधी जाहीर केला. यासंदर्भातील पत्रही त्यांनी कार्यक्रमात सुपूर्द केले. समाजातील गुणवंतांचा सन्मान, युवकांना प्रेरणा, संतांच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा सोहळा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित समाजबांधवांनी या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही अशाच विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

COMMENTS