Homeताज्या बातम्या

सौ. के.एस.के. महाविद्यालयात ‘अद्यावत रक्षा तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर भारत’ विषयावर व्याख्यान संपन्न; DRDO चे निवृत्त शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांचे मार्गदर्शन

बीड: येथील नवगण शिक्षण संस्थेच्या सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभाग, रिसर्च अँ

सुरतहून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्सला पुराचा वेढा; परळीतील दोघांसह ४० प्रवासी टपावर, ड्रायव्हर पळाला!
न्यायपालिकेने केली जंतरमंतर लाठिमार चौकशीची मागणी !
पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त २६ जुलै रोजी ’ताल साधना म्युझिक सर्कल’चा भव्य पुरस्कार सोहळा

बीड: येथील नवगण शिक्षण संस्थेच्या सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभाग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट कमिटी व सायन्स फोरमच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक २८ जुलै २०२६ रोजी निवृत्त शास्त्रज्ञ (डी.आर.डी.ओ.) श्री. काशिनाथ देवधर यांचे ‘अद्यावत रक्षा तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर भारत’ या विषयावर विशेष व्याख्यान पार पडले.

यावेळी श्री. काशिनाथ देवधर यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. न्यूटनचे तीन नियम, त्यांचा व्यावहारिक उपयोग आणि संशोधन यावर प्रकाश टाकताना त्यांनी १९९६ साली स्वीडनकडून मिळालेल्या २६ किलोग्रॅमच्या शस्त्राचे दोन वर्षे संशोधन करून १४ किलोग्रॅमपर्यंत वजन कमी केल्याचा रंजक अनुभव सांगितला. तसेच ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव आणि त्यांच्याकडून मिळालेली शाबासकी, स्वदेशी बनावटीचा अर्जुन रणगाडा, लष्करी सामग्रीच्या बाबतीत आत्मनिर्भर झालेला भारत, चाळीस वर्षांच्या सेवेतील टीमवर्क, भौतिकशास्त्रामधील रडार व सोनार यंत्रणांचा वापर आणि ‘हर काम देश के नाम’ ही भावना याविषयी तांत्रिक व वैज्ञानिक माहिती दिली. यावेळी विविध उपकरणांच्या कार्याविषयी एक लघुपटही दाखवण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शिवानंद क्षीरसागर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी शास्त्रज्ञांसोबत विद्यार्थ्यांची झालेली ही ‘ग्रेट भेट’ प्रेरणादायी असल्याचे सांगत या स्फूर्तीदायक व्याख्यानाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रो. डॉ. अशोक डोंगरे यांनी केले, तर आभार श्री. रुपेश कोकाटे यांनी मानले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य अनिता शिंदे, पदव्युत्तर विभागाचे संचालक डॉ. ए.जे. खान, कमवि प्राचार्य नारायण काकडे सर, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन.सी.सी. कॅप्टन प्रा. बी. टी. पोटे, डॉ. सानप बी. एम., प्रा. शिवाजी राऊत, प्रा. प्रदीप साळुंखे, प्रा. अनंता सोळुंके, प्रा. रवी बन, प्रा. काझी, प्रा. धनंजय बुरांडे आणि श्री. बालाजी चौरे यांनी विशेष सहकार्य केले. या व्याख्यानासाठी विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त व लक्षणीय उपस्थिती होती.

COMMENTS