Homeताज्या बातम्या

महापौर कविता मुळे यांची मोठी घोषणा : प्रत्येक नगरसेवकाला 50 लाखांचा विकास निधी

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा निर्णय घेत महापौर कविता मुळे यांनी प्रत्येक नगरसेवका

शिंदेंच्या जाहिरातींना फडणवीस समर्थकांचे नांदेडमध्ये प्रत्युत्तर
रायचूर एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न फसलाधाडसी महिलेच्या प्रसंगावधानाने चोरट्याचा डाव उधळला; रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
अहिल्यादेवींच्या नावाने उमेद मॉल सुरू करणार : पालकमंत्री विखे यांची घोषणा



नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा निर्णय घेत महापौर कविता मुळे यांनी प्रत्येक नगरसेवकाला 50 लाख रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा केली. प्रशासकीय राजवटीचा कालावधी आणि मागील सहा महिन्यांत रखडलेल्या विकासकामांची तूट भरून काढण्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याने नगरसेवकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची पहिली अर्थसंकल्पीय सभा गुरुवारी स्टेडियम परिसरातील शंकरराव चव्हाण परीक्षा केंद्राच्या सभागृहात पार पडली. यावेळी उपमहापौर दीपकसिंह रावत, महापालिका आयुक्त महेश कुमार डोईफोडे, सर्व पक्षांचे नगरसेवक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. अर्थसंकल्पीय सभेत विविध विकासकामांबरोबरच शहराच्या पायाभूत सुविधांवर, महसूल वाढीवर आणि नागरिकाभिमुख योजनांवर चर्चा करण्यात आली. सभेत भाजपाचे नगरसेवक साहेबराव गायकवाड यांनी लातूर फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून जमीन ताब्यात घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. या स्मारकाचे काम तातडीने सुरू व्हावे यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करून 10 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच अर्थसंकल्पात काही सार्वजनिक हिताच्या कामांसाठी अपेक्षित निधी न दिल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. सभेदरम्यान शहरातील लहान व मध्यम व्यापार्‍यांना दिलासा देणारे निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली. व्यापार्‍यांवरील शुल्काचा फेरविचार करावा, थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी विशेष पथके नियुक्त करावीत, जीपीएसच्या साहाय्याने शहरातील मालमत्तांचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच महानगरपालिकेच्या खर्चात बचत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पांचे टेंडर काढावेत, अशा सूचनाही नगरसेवकांनी मांडल्या. महापौरांनी जाहीर केलेला 50 लाख रुपयांचा विकास निधी हा नव्या सभागृहातील नगरसेवकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. या निधीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागातील रस्ते, नाले, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा जलदगतीने पूर्ण करण्यास मदत होणार असल्याची भावना अनेक नगरसेवकांनी व्यक्त केली. त्यामुळे आगामी काळात शहरातील प्रलंबित विकासकामांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS