अहिल्यानगर: हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. सततच्या पावसामुळे गडचिरोल

अहिल्यानगर: हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. सततच्या पावसामुळे गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसराला पुराचा मोठा विळखा बसला असून, गोंदिया जिल्ह्यात चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे.
गडचिरोली: १८ प्रमुख मार्ग बंद, आलापल्ली शहरात शिरले पाणी
गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली पुलावरून पूरपाणी वाहत असल्याने चार गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. आलापल्ली शहरातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून स्थानिक पेट्रोल पंपालाही पाण्याने वेढा घातला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील तब्बल १८ प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्गावरील रांगी नाला, आलापल्ली-सिरोंचा महामार्गावरील मोसम व टेकमपल्ली नाले, आणि आष्टी-आलापल्ली मार्गावरील दीना नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. याशिवाय एटापल्ली, अहेरी, मुलचेरा, धानोरा, कोरची, कुरखेडा, चामोर्शी आणि आरमोरी तालुक्यांतील अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त मार्गांवरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
अमरावती: मेळघाटात सिपना नदीला पूर, २५ गावांचा संपर्क तुटला
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. सिपना नदीला पूर आल्याने आणि पाणी पुलावरून वाहत असल्याने सुमारे २० ते २५ गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, पूर्णा प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणाचे तीन दरवाजे २० सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत.
गोंदिया: वडेगाव बंध्या येथे चक्रीवादळ, १०० हून अधिक झाडे उन्मळून पडली
गोंदिया जिल्ह्याला देण्यात आलेल्या रेड अलर्टदरम्यान मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बंध्या गावात रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसासह चक्रीवादळाने थैमान घातले. या जोरदार चक्रीवादळामुळे १०० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली आहेत. २ घरांची पडझड होऊन ८ जण जखमी झाले आहेत.
जखमींपैकी नीमरीत ताराम आणि संदीप ताराम या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कुरखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर इतर ६ जणांवर केशोरी येथे उपचार सुरू आहेत. अनेक घरे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याने प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

COMMENTS