बीड : आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या युगात जिथे रक्ताची नातीही पैशासाठी दुरावताना दिसतात, तिथे बीड शहरातील भाजी मंडई परिसरातील ‘जिव्हाळा बेघर निव

बीड : आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या युगात जिथे रक्ताची नातीही पैशासाठी दुरावताना दिसतात, तिथे बीड शहरातील भाजी मंडई परिसरातील ‘जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात’ निराधार, अपंग, वंचित वृद्ध महिला-पुरुष तसेच अनाथ बालकांसाठी प्रत्यक्ष ‘माउली’ बनून उभ्या ठाकलेल्या छाया सरोदे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘युवा लोकमित्र जिव्हाळा माउली सन्मान 2026’ जाहीर करण्यात आला आहे.
‘साप्ताहिक युवा लोकमित्र’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आणि सहाव्या वर्षात पदार्पण सोहळ्याच्या औचित्याने युवा लोकमित्र परिवाराच्या पुरस्कार निवड समितीने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. समाजाकडून विस्मरणात गेलेल्या, हतबल आणि आधारहीन वृद्धांच्या जीवनात छाया सरोदे या मायेचा दीप बनल्या आहेत. जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात त्या दररोज न चुकता दोन वेळचे जेवण तयार करतात. केवळ अन्नदानापुरते त्यांचे कार्य मर्यादित नसून आजारी, असहाय्य आणि बेघर वृद्धांची सेवा, त्यांचे दुःख समजून घेणे, त्यांना मानसिक आधार देणे आणि कुटुंबाप्रमाणे जिव्हाळा देणे हेच त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय बनविले आहे. कोणत्याही प्रसिद्धीची किंवा आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता अत्यंत प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने सुरू असलेल्या त्यांच्या या मानवतावादी कार्याची दखल युवा लोकमित्र पुरस्कार समितीने घेतली आहे. समाजातील शेवटच्या घटकाची अहोरात्र सेवा करणार्या अशा खर्याखुर्या ‘माउली’चा गौरव करताना युवा लोकमित्र परिवाराला अभिमान वाटत असल्याचे मत साप्ताहिक युवा लोकमित्रचे संपादक शेख ताहेर जाफर यांनी व्यक्त केले. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. 20 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता बीड येथील ताज पॅलेस येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. छाया सरोदे यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर होताच बीड जिल्ह्यासह विविध सामाजिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या अथांग मातृत्वपूर्ण सेवाभावाचा गौरव केला जात आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक निराधारांना जगण्याचा आधार मिळाला असून, समाजसेवेच्या क्षेत्रात त्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात आहेत.

COMMENTS