Homeताज्या बातम्या

पिंपरनईचा गावतलाव कोरडा; ग्रामस्थांवर खड्डे खोदून सांडपाणी वापरण्याची वेळवेळीच पाणीउपसा थांबवला असता तर ही वेळ आली नसती – सुनील भोसले

बीड तालुक्यातील पिंपरनई येथील गाव साठवण तलावातील पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्याने तलाव अक्षरशः कोरडा पडला असून ग्रामस्थांवर तलावा

सरस्वती विद्यालय तेलगाव ची यशाची परंपरा कायम
मातीशी नाळ जपणारा अधिकारी : जरूडमध्ये तहसीलदार शेळके यांचा शेतशिवार व शाळेला थेट भेट
जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षेखा.बजरंग सोनवणेंनी बीडचा आवाज दिल्लीत घुमवला



बीड तालुक्यातील पिंपरनई येथील गाव साठवण तलावातील पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्याने तलाव अक्षरशः कोरडा पडला असून ग्रामस्थांवर तलावात खड्डे खोदून झिरपणारे पाणी आंघोळ, कपडे धुणे व इतर दैनंदिन वापरासाठी वापरण्याची वेळ आली आहे. या गंभीर परिस्थितीबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
क्रामेड सुनील भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यातच भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन तलावातील पाणी शेतीसाठी उपसा थांबविण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर तलाठी गणपत पोतदार यांनी दोनदा तलाव परिसराला भेट देऊन संबंधितांना पाणी उपसा न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करून पाणी उपसा सुरूच राहिल्याने आज तलावात केवळ गाळ शिल्लक राहिला आहे. तलावातील उरलेले पाणी हिरव्या रंगाचे व दूषित झाल्याने ते थेट वापरण्यायोग्य राहिले नाही. त्यामुळे ग्रामस्थ तलावात खड्डे खोदून झिरपणारे पाणी वापरत आहेत. शासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुनील भोसले यांनी केली आहे.
जिल्हाधिकार्‍यांचे आदेश कागदावरच – डॉ. गणेश ढवळे
सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी मार्च महिन्यातच जिल्हाधिकारी विवेक जानसन यांच्याकडे जिल्ह्यातील तलाव व लघु-मध्यम प्रकल्पांमधून सुरू असलेल्या अवैध पाणी उपशाबाबत लेखी तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पिण्याच्या पाण्याचे नियोजन बिघडू नये म्हणून नियमबाह्य पाणी उपसा तात्काळ थांबविण्याचे आदेश महसूल व पाटबंधारे विभागाला दिले होते. मात्र अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी नियुक्त पथक प्रभावी कारवाई करण्यात अपयशी ठरल्याने प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याची टीका डॉ. ढवळे यांनी केली. आज पिंपरनईतील परिस्थिती ही प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम असून त्याचे गंभीर परिणाम ग्रामस्थांना भोगावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट
बीड जिल्ह्यातील 143 प्रकल्पांपैकी तब्बल 73 प्रकल्प कोरडे पडले असून 54 प्रकल्पांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सुमारे 85 ते 90 टक्के धरणांनी तळ गाठला आहे. जून महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही जिल्ह्यात केवळ 5.49 टक्के पावसाची नोंद झाली आहे. बीड तालुक्यातील बिंदुसरा धरणात अवघा 23 टक्के तर सिंदफणा धरणात 16.5 टक्के जलसाठा शिल्लक आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत असून शेतकर्‍यांनी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे. हवामानातील बदलांचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने विशेष टास्क फोर्सची स्थापना केली असून जलयुक्त शिवार व गाळमुक्त धरण यांसारखी जलसंधारणाची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

COMMENTS