मथुरा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तर प्रदेश दौर्याच्या समारोपदिनी गोवर्धन पर्वताची परिक्रमा केली. कुटुंबीयांसह त्यांनी दानघाटी मंदिरात

मथुरा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तर प्रदेश दौर्याच्या समारोपदिनी गोवर्धन पर्वताची परिक्रमा केली. कुटुंबीयांसह त्यांनी दानघाटी मंदिरात गिरिराजजींचे दर्शन घेत अभिषेक व पूजन केले. त्यानंतर सुमारे एकवीस किलोमीटरची परिक्रमा करताना काही अंतर पायी चालत, तर उर्वरित प्रवास गोल्फ वाहनातून करत त्यांनी दीड तासांत परिक्रमा पूर्ण केली. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्या वृंदावन येथून दानघाटी मंदिरात दाखल झाल्या. येथे त्यांनी पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून प्रसाद अर्पण केला. या वेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची उपस्थिती होती. मंदिर परिसरात आणि गोवर्धन नगरीत त्यांच्या स्वागतासाठी विशेष सजावट करण्यात आली होती.
परिक्रमेच्या प्रारंभी राष्ट्रपती काही अंतर पायी चालल्या. वाटेत उभ्या असलेल्या भाविकांना त्यांनी हात जोडून अभिवादन केले. त्यानंतर कुटुंबीयांसह गोल्फ वाहनातून पुढील प्रवास करत परिक्रमा पूर्ण केली. परिक्रमा मार्गावर सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात आली होती, तर स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या दौर्यादरम्यान राष्ट्रपतींनी अयोध्येत प्रभू रामलल्लाचे दर्शन घेतले होते, तसेच वृंदावनमध्ये संत प्रेमानंदजी महाराज यांची भेट घेत आध्यात्मिक संवाद साधला होता. मथुरेचा हा त्यांचा दुसरा दौरा असून यापूर्वी त्यांनी बांके बिहारी मंदिरालाही भेट दिली होती. गोवर्धन नगरीत राष्ट्रपतींच्या आगमनानिमित्त सर्वत्र रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. दानघाटी मंदिरात गिरिराजजींचा विशेष शृंगार करण्यात आला होता. स्वतंत्र भारतात प्रथमच एखाद्या राष्ट्रपतीने गोवर्धन परिक्रमा केल्याने या भेटीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने दिल्लीकडे रवाना झाल्या. यावेळी स्थानिक जनप्रतिनिधींसह मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS