अहिल्यानगर : शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहाराच्या तपासाला वेग दिला असून, राज्य महिला

अहिल्यानगर : शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहाराच्या तपासाला वेग दिला असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या घडामोडीमुळे तपासाची व्याप्ती अधिक विस्तारत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणात अशोक खरातविरोधात बेकायदा सावकारी व आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान समता पतसंस्थेत त्याच्याशी संबंधित अनेक संशयास्पद खाती उघडकीस आली. यामध्ये प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावावर असलेल्या चार खात्यांचाही समावेश आहे. या खात्यांमधून सुमारे 2 कोटी 40 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या रकमेचा स्रोत, तसेच त्याचा सावकारी व्यवहाराशी संबंध आहे का, याचा शोध घेण्यासाठीच पोलिसांनी नोटीस बजावली आहे. माहितीनुसार, शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर टपालाद्वारे नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत शिर्डी पोलिस ठाण्यात हजर राहून जबाब नोंदवणे त्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. तपासादरम्यान अशोक खरातने पतसंस्थांच्या माध्यमातून अवैध पैसा व्यवहारात आणल्याचा संशय अधिक बळावला आहे. समता पतसंस्थेत त्याचा नामनिर्देशित म्हणून समावेश असलेली शंभरहून अधिक खाती आढळली आहेत. ही खाती सुमारे सत्तावन्न व्यक्तींच्या नावावर असून, त्यामधून साठ कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याची माहिती पुढे आली आहे. या खात्यांतील व्यवहारांची चौकशी करताना आतापर्यंत तेहतीस खातेदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अनेक खातेदारांनी आपल्या नावावर अशी खाती अस्तित्वात असल्याची माहितीच नसल्याचे सांगितले आहे. यामुळे या प्रकरणातील गैरव्यवहाराचे स्वरूप अधिक गंभीर असल्याचे दिसून येते. आता प्रतिभा चाकणकर यांचा जबाब या तपासातील महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, जगदंब पतसंस्थेतही अशोक खरात नामनिर्देशित असलेली बत्तीस खाती आढळून आली आहेत. या खात्यांतील व्यवहारांचाही पोलिसांकडून बारकाईने तपास सुरू आहे.
दरम्यान, अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना आधीच मोठा राजकीय फटका बसला आहे. कथित संबंधांमुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला, तसेच पक्षातील महिला आघाडीच्या प्रमुखपदावरूनही पायउतार व्हावे लागले आहे. तपास यंत्रणेकडून त्यांनाही समन्स बजावल्याची चर्चा असली, तरी त्याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, सध्याच्या घडामोडींवरून या प्रकरणाचे पडसाद आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

COMMENTS