Homeताज्या बातम्या

‘एफ’ ग्रेड कायम असलेल्या ७ महाविद्यालयांतील पीजी प्रवेश स्थगित; २२ महाविद्यालयांना मोठा दिलासा

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्ता सुधारण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कडक पाऊल उचलले आहे. 'एफ

माळेगाव येथे नैसर्गिक शेती शाळेत शेतकर्‍यांना मार्गदर्शन; सोयाबीन पिकासाठी विषमुक्त शेतीचा संदेश
स्वतःविरुद्धच गुन्हा दाखल करा! उपविभागीय अधिकार्‍यांचे थेट किनवट तहसीलदारांना पत्र; प्रशासकीय वर्तुळात प्रचंड संभ्रम
तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईची धास्ती; नांदेडच्या बाजारातून सुटे खाद्यतेल गायब, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांचा हिशोब कोण घेणार?

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्ता सुधारण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कडक पाऊल उचलले आहे. ‘एफ’ (F) ग्रेड कायम असलेल्या क्षेत्रातील ७ महाविद्यालयांमधील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या पारंपारिक पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशावर स्थगिती लागू करण्यात आली आहे. दुसरीकडे, पुनर्तपासणीनंतर आवश्यक सुधारणा करणाऱ्या २२ महाविद्यालयांना मोठा दिलासा देत त्यांची नावे ‘एफ’ ग्रेडच्या यादीतून वगळण्यात आली आहेत.

यापूर्वी विद्यापीठाने ‘एफ’ ग्रेड प्राप्त २९ महाविद्यालयांना शैक्षणिक व प्रशासकीय त्रुटी दूर करण्यासाठी मुदत दिली होती. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांनी केलेल्या सुधारणांची तज्ज्ञ समितीमार्फत तपासणी करण्यात आली. समितीच्या अहवालानुसार, अपेक्षित सुधारणा करणाऱ्या १६ महाविद्यालयांना ‘एफ’ ग्रेडमधून मुक्त करण्यात आले, तर तांत्रिक कारणांमुळे ‘एफ’ ग्रेड मिळालेल्या आणखी ६ महाविद्यालयांनाही दिलासा देण्यात आला. अशा प्रकारे एकूण २२ महाविद्यालयांची नावे या यादीतून वगळण्यात आली आहेत.

या २२ महाविद्यालयांना मिळाला दिलासा:

‘एफ’ ग्रेडमधून वगळण्यात आलेल्यांमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (वसरणी), संत गाडगे महाराज महाविद्यालय (लोहा), पानसरे महाविद्यालय (अर्जापूर), शरदचंद्र कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (नायगाव), जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय (नांदेड), वै. धुंडा महाराज देगलूरकर कॉलेज (देगलूर), श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (माहूर), राजीव गांधी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट, एमजीएम कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड मीडिया सायन्स, विश्वभारती महाविद्यालय, श्री गुरू गोविंदसिंगजी पत्रकारिता महाविद्यालय (नांदेड), डीएसएम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (परभणी), स्वामी विवेकानंद महाविद्यालय (शिरूर ताजबंद), मातृभूमी महाविद्यालय (उदगीर), सरस्वती संगीत कला महाविद्यालय आणि ब्रिलियंट (रात्रीचे) महाविद्यालय (लातूर) यांचा समावेश आहे. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम नसतानाही ऑनलाईन ‘ट्रिपल ए’ प्रस्ताव सादर करणाऱ्या पाच महाविद्यालयांसह इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी (विष्णुपुरी) या व्यावसायिक महाविद्यालयालाही तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनंतर ‘एफ’ ग्रेडमधून वगळण्यात आले आहे.

या ७ महाविद्यालयांवर प्रवेश बंदीची कारवाई:

दुसरीकडे, पुनर्तपासणीत कोणतीही समाधानकारक सुधारणा न केल्याने छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालय (किनवट), यशवंत कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (परभणी), रवींद्रनाथ टागोर चित्रकला महाविद्यालय (परभणी), छत्रपती संभाजी महाराज महाविद्यालय (माहूर), सिंधू कॉलेज ऑफ आय.टी. अँड सायन्स (देगलूर), संत संभाजी शिंदे कॉलेज ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स (परभणी) आणि विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (नांदेड) या ७ महाविद्यालयांमध्ये पीजी प्रथम वर्षाच्या प्रवेशावर स्थगिती लागू करण्यात आली आहे.

विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, प्रवेशबंदी असतानाही संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाची राहील. अशा विद्यार्थ्यांचे पात्रता अर्ज, परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, परीक्षा प्रवेशपत्र दिले जाणार नाही तसेच त्यांचा निकालही जाहीर केला जाणार नाही. विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुधारित परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, या निर्णयाद्वारे शैक्षणिक गुणवत्ता, उत्तरदायित्व आणि विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS