पतंजलीला उपरती

Homeसंपादकीय

पतंजलीला उपरती

एकतर योगगुरू म्हणवून घ्यायचे, दुसरीकडे व्यापार करायचा, तिसरीकडे आपल्या स्पर्धकांची जाहिरातीत खिल्ली उडवायची असे रामदेवबाबांचे वागणे आहे. राजगुरू असल्याच्या थाटात सरकारचा आपल्याला पाठिंबा असल्याचा समज करून घेऊन

समाजमनावर झालेले संस्कार हेच आत्महत्येचे कारण!
आता हमीभावासाठी शेतकर्‍यांचा लढा
विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा

एकतर योगगुरू म्हणवून घ्यायचे, दुसरीकडे व्यापार करायचा, तिसरीकडे आपल्या स्पर्धकांची जाहिरातीत खिल्ली उडवायची असे रामदेवबाबांचे वागणे आहे. राजगुरू असल्याच्या थाटात सरकारचा आपल्याला पाठिंबा असल्याचा समज करून घेऊन वादग्रस्त वक्तव्ये करण्यात रामदेवबाबा पटाईत आहे. इतर उत्पादनांना दुय्यम लेखण्याच्या त्यांच्या वृत्तीला न्यायालयानेच लगाम घातला होता. एकतर राजकारण करायचे, नाहीतर धर्मकारण; परंतु रामदेवबाबा दोन्ही एकत्र करून गल्लत करतात आणि मग टीका ओढवून घेतात. 

वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करायची, वादग्रस्त दावे करायचे आणि अंगलट आले, की माघार घ्यायची, हे रामदेवबाबांच्या बाबतीत अलीकडे वारंवार घडले आहे. कोरोनिलच्या बाबतीत तोच अनुभव आला आहे. भारतात अ‍ॅलोपथी, नॅचरोपथी, होमिओपथी, आर्युवेद, युनानी आदी उपचारपद्धती आहे. ज्याने ज्याचे शिक्षण घेतले, त्याची प्रॅक्टिस करावी, असा संकेत आहे; परंतु आता अन्य उपचारपद्धतीचे शिक्षण घेतलेले अ‍ॅलोपथी पद्धतीने उपचार करतात. त्यामुळे अगोदरच अ‍ॅलोपथी विरुद्ध अन्य पथी असा संघर्ष आहे. शुद्ध आयुर्वेद, होमिओपथीद्वारे उपचार करणारे नामवंतही देशात आहे. शुद्ध उपचार करणार्‍यांनाही चांगला व्यवसाय करता येतो. खरेतर वेगवेगळ्या उपचारपद्धतीचे वेगळे महत्त्व असते. त्यातील कुणीच श्रेष्ठत्वाचा दावा न करता समन्वयाने काम करायला हवे; परंतु तसे होताना दिसत नाही. आधुनिक वैद्यक शास्त्र म्हणजे अ‍ॅलोपथी. ती डोळस आहे. आंधळा विश्‍वास ठेवत नाही, प्रयोगशील आहे. स्वतःच्या निर्णयांची चिकित्सा करते. निरीक्षणांनी आणि संख्या शास्त्राच्या सुयोग्य वापराने अधिकाधिक उत्तम ते स्वीकारते. प्रयोग करते आणि त्या विषयी इतरांना माहिती देते, ज्ञान प्रसाराला महत्त्व देते. जे औषध दिले आहे ते नक्की काय आहे, हे औषधाच्या पाकिटावर लिहिलेले असते. ते शरीरामध्ये नक्की कसे काम करते, कोणत्या अवयवामधून शरीराबाहेर पडते वगैरे सर्व अभ्यास केलेला असतो. औषध कोणाला चालणार नाही याचीही माहिती दिली जाते. काही दुष्परिणाम असतील, तर ते उघडपणे सांगितले जातात. त्यावर उपाय सांगते. थोडक्यात आधुनिक वैद्यक हे पारदर्शक आहे आणि पुरावाजन्य- ‘एव्हिडन्स बेस्ड’ आहे. या पथीला काही मर्यादा असल्या, तरी तिला दोष देणे योग्य नाही. एखाद्या महामारीवर जेव्हा कोणतेही औषध संशोधित झालेले नसते, तेव्हा या विकाराशी समकक्ष असलेल्या अन्य विकारांवरील औषधे प्रयोगादाखल दिली जात असतात. कोरोनाच्या बाबतीत तसेच झाले आहे. कोरोनाची बाधा झालेल्यांवर प्रतिकारशक्ती वाढविण्याचे, तसेच नीट श्‍वास घेता येतील, असे उपचार केले जातात. प्राणवायूची आवश्यकता भासली, तर तोही देण्याची गरज असते. या पार्श्‍वभूमीवर अ‍ॅलोपथीला स्टुपिड म्हणणे, प्राणवायू काय लावता, योगासने करा, खुल्या निसर्गात जाऊन प्राणवायू घ्या, असे रामदेवबाबांचे म्हणणे अवैज्ञानिक आहे आणि कोरोनाबाधितांना मृत्यूच्या दारात ढकलण्यासारखे आहे. कोरोना संकटाच्या काळात योगगुरु रामदेव बाबा यांच्या एका वक्तव्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रामदेवबाबा यांनी कोरोनावरील अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्‍वास व्यक्त केला आहे. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (इमा)ने आक्रमक भूमिका घेतली आहे. रामदेवबाबा यांच्यावर कारवाई कठोर कारवाई करा किंवा अ‍ॅलोपथी उपचारपद्धती बंद तरी करा, असा पर्याय ’इमा’ने केंद्रीय  आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना दिला आहे. आरोग्यमंत्री स्वतः अ‍ॅलोपथीचे डॉक्टर आहेत. विशेष म्हणजे रामदेवबाबा आणि पतंजलीचे सरचिटणीस आचार्य बालकृष्ण यांनी अनेकदा अ‍ॅलोपथीचे उपचार घेतले असताना त्यांना अ‍ॅलोपथीवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी भूमिका ’इमा’ने घेतली आहे. कोविड उपचार पद्धतीमध्ये फॅबिफ्लू आणि स्टेरॉईड्ससह अन्य प्रतिजैविकेही फोल ठरल्याचे वक्तव्य रामदेवबाबा यांनी म्हटले होते. या संकटाच्या काळात फ्रंटलाईनवर काम करणार्‍या बाराशे अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी बलिदान दिले, असे ’इमा’ ने म्हटले आहे. रामदेव बाबांनी अ‍ॅलोपॅथी ही एक मूर्ख आणि लंगडे विज्ञान असल्याचे सांगत त्याबाबत अविश्‍वास दाखवला. सर्वात आधी हायड्रोक्लोरिक्विन फेल ठरले. त्यानंतर प्लाझ्मा थेरपी आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरल्याचे रामदेवबाबा यांनी म्हटले. इतकेच नाही तर आज लाखो लोकांचा मृत्यू हा अ‍ॅलोपॅथीमुळे झाल्याचा आरोप त्यांनी केला. कोविड हा विषाणूजन्य आजार आहे आणि त्यामुळे जवळपास 80 टक्के रुग्ण काहीही न करता बरे होतात. यातील काही रुग्ण जेव्हा गंभीर होऊ लागतात, अशावेळी जीवरक्षक ऑक्सिजन आणि औषधे घेण्यासाठी अ‍ॅलोपथीकडे पाठवले जातात. आधुनिक वैद्यक सर्वोत्तम आहे असा कधीच कोणाचा दावा नव्हता. यामध्ये व्यक्तिसापेक्षता नाही. औषधे व डोस हे गटासाठी सारखी असतात. कारण त्यांची निर्मिती ही आता कारखान्यामध्ये होते; मात्र वयानुसार आणि वजनानुसार त्यांचे डोस प्रयोगांती नियमित केले जातात. मानवी शरीर हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे आणि अजूनही आपण त्यातील बारकावे शिकत आहोत. त्यामुळे काही आजारांवर सुयोग्य उपचार अजून उपलब्ध नाहीत. अशावेळी प्रत्येक पॅथीमधील उत्तम ते घेऊन सर्वंकष उपचारपद्धती हे आपले ध्येय असायला हवे. ’इमा’ने थेट रामदेवबाबांना नोटीस पाठविल्यानंतर आता आचार्य बालकृष्ण यांना उपरती झाली. रामदेवबाबा यांच्या पतंजलीने सारवासारव केली आहे. पतंजली योगपीठ ट्रस्टचे सरचिटणीस आचार्य बालकृष्ण यांनी स्वाक्षरी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे, की आधुनिक विज्ञान आणि आधुनिक वैद्यकीय अभ्यासाद्वारे औषधोपचार करणार्‍यांविरोधात स्वामींचा कोणताही चुकीचा हेतू नाही. टीका आणि कायदेशीर अडचण आल्यानंतर सुचलेले हे शहाणपण आहे.

COMMENTS