Homeताज्या बातम्या

पार्किंगशिवाय परवानगी, वाहतूक कोंडीला प्रशासनाचा आशीर्वाद? फुले मार्केट परिसरातील नियोजनावर गंभीर प्रश्न

नांदेड: शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असताना, महात्मा फुले मार्केट परिसरातील काही मोठ्या कापड दुकानांमुळे हा प्रश्न अधिकच ब

‘साहित्यवेल’तर्फे डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा साहित्यिक सन्मान
मुंबई लोकलमध्ये थरार! डब्यात पाऊस येण्यावरून झालेल्या वादात २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या
अध्यक्ष राहुल नार्वेकरांची सभागृहात दिलगिरी! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावरील शोकप्रस्ताव वाचनावेळी झाल्या होत्या गंभीर चुका

नांदेड: शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असताना, महात्मा फुले मार्केट परिसरातील काही मोठ्या कापड दुकानांमुळे हा प्रश्न अधिकच बिकट बनल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेषतः परराज्यातील मोठ्या कापड व्यावसायिकांना पार्किंगची कोणतीही सक्षम व्यवस्था नसतानाही व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल आता महापालिका आणि वाहतूक पोलिस प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

महात्मा फुले मार्केट हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा व्यापारी परिसर आहे. येथे दररोज हजारो नागरिक खरेदीसाठी येतात. अशा ठिकाणी मोठ्या व्यापारी आस्थापनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था असणे ही मूलभूत अट मानली जाते. मात्र, प्रत्यक्षात अनेक दुकानांसमोर चारचाकी वाहनांच्या रांगा लागत असून, रस्ताच पार्किंगमध्ये बदलल्याचे चित्र दिसून येते. परिणामी मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा वेग मंदावतो, सतत कोंडी निर्माण होते आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

स्थानिक व्यापारी, नागरिक आणि वाहनचालकांचा आरोप आहे की, पार्किंगचा कोणताही आराखडा नसतानाही संबंधित व्यावसायिकांना व्यवसायाची परवानगी देण्यात आली. महापालिका, नगररचना विभाग आणि वाहतूक पोलिसांनी याबाबत कोणती तपासणी केली होती का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. या परिसरात रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने किंवा इतर आपत्कालीन सेवांना मार्ग काढणे अनेकदा कठीण ठरते. दुकानदारांसमोर उभ्या असलेल्या वाहनांमुळे पादचार्‍यांनाही रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

वाहतूक तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही मोठ्या व्यापारी आस्थापनाला परवानगी देताना पार्किंग आणि सार्वजनिक सुरक्षेचे निकष काटेकोरपणे तपासले जाणे आवश्यक असते. महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि वाहतूक शाखेने या प्रकरणाची संयुक्त पाहणी करून पार्किंगविना सुरू असलेल्या आस्थापनांवर कारवाई करावी आणि फुले मार्केट परिसरासाठी स्वतंत्र वाहतूक व पार्किंग आराखडा जाहीर करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

COMMENTS