बीड गेल्या दशकभराहून अधिक काळ स्वतःचे संपूर्ण आयुष्य गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित करणारे बीडचे रुग्णसेवक अमजद खान यांना यंदाचा अ

बीड गेल्या दशकभराहून अधिक काळ स्वतःचे संपूर्ण आयुष्य गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित करणारे बीडचे रुग्णसेवक अमजद खान यांना यंदाचा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा क्रांतीवीर अशफाक उल्ला खान स्मृती मानवतावादी गौरव पुरस्कार – 2026 जाहीर करण्यात आला आहे.
’साप्ताहिक युवा लोकमित्र’ वृत्तपत्राच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच सहाव्या वर्षात पदार्पण सोहळ्याचे औचित्य साधून ’युवा लोकमित्र परिवार’च्या वतीने या सर्वोच्च पुरस्काराची घोषणा करण्यात आली. समाजाच्या कल्याणासाठी निस्वार्थपणे कार्य करणार्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या परंपरेनुसार यंदा अमजद खान यांच्या उल्लेखनीय मानवसेवेची दखल घेण्यात आली आहे. पुरस्कार निवड समितीने त्यांच्या अथांग, निस्वार्थ आणि संवेदनशील सेवाकार्याचा गौरव करत एकमताने त्यांची निवड केली. अमजद खान हे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात गरजू रुग्णांसाठी देवदूत म्हणून कार्यरत आहेत. कर्करोग, किडनीचे गंभीर आजार तसेच इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देणे, औषधोपचारांची व्यवस्था करणे आणि आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत असतात. त्यांच्या सेवाकार्यातील सर्वात हृदयस्पर्शी पैलू म्हणजे बीड शहर व परिसरातील लावारिस मृतदेहांवर स्वतःच्या खर्चाने सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करणे. जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन केवळ मानवतेच्या भावनेतून त्यांनी आजवर शेकडो लावारिस व्यक्तींना सन्मानाने अखेरचा निरोप दिला आहे.दरम्यान, हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अमजद खान यांच्यावर संपूर्ण बीड जिल्ह्यातील सामाजिक संघटना, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, सामान्य नागरिक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
20 जून रोजी भव्य सोहळ्यात होणार गौरव
हा गौरव सोहळा शनिवार, दि. 20 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ताज पॅलेस, कादरपुरा, बार्शीनाका, बीड येथे दिमाखात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास आमदार विजयसिंह राजे पंडित, नगराध्यक्षा प्रेमलता ताई पारवे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते अमजद खान यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
चौकट
अमजद खान हे बीड जिल्ह्याचे भूषण आहेत. आजच्या काळात जिथे माणूस माणसाला विसरत चालला आहे, तिथे ते रुग्णांची सेवा करण्याबरोबरच लावारिस मृतदेहांवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचे महान कार्य करत आहेत. थोर क्रांतिकारक अशफाक उल्ला खान यांच्या नावाचा पुरस्कार त्यांना प्रदान करताना युवा लोकमित्र परिवाराचे हात धन्य झाले आहेत.
– शेख ताहेर जाफर
संपादक, साप्ताहिक युवा लोकमित्र, बीड

COMMENTS