नांदेड - नृत्य, संगीत, लोककला, लावणी, शास्त्रीय व उपशास्त्रीय कलाप्रकारांचा बहुरंगी आविष्कार घडविणारा ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव’ 14 ते 16 ऑगस्ट

नांदेड – नृत्य, संगीत, लोककला, लावणी, शास्त्रीय व उपशास्त्रीय कलाप्रकारांचा बहुरंगी आविष्कार घडविणारा ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव’ 14 ते 16 ऑगस्टदरम्यान कुसुम सभागृहात रंगणार आहे. सप्तरंग सेवाभावी संस्था व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात देशातील आठ राज्यांमधून सुमारे 500 कलाकार सहभागी होणार असून, 470 हून अधिक सादरीकरणे होणार आहेत. सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा तथा तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहउपाध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाची माहिती दिली. यंदा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले रंगमंच’ आणि ‘कै. तीजनबाई रंगमंच’ असे दोन स्वतंत्र रंगमंच उभारण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या सहकार्याने आंतरशालेय वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सप्तरंग संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर होणार आहे. 15 व 16 ऑगस्ट रोजी तृतीयपंथी सक्षमीकरण चर्चासत्र, जनजागृती अभियान व रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शासनाच्या योजना, रोजगाराच्या संधी, कायदेशीर हक्क व स्वावलंबनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. महोत्सवादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला अक्षय कदम, डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार आणि कविता जोशी उपस्थित होते.

COMMENTS