कुंडलवाडी - यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पावसाने शेतकर्यांची परीक्षा घेतली आहे. जून महिना जवळपास पाण्याविनाच कोरडा गेल्याने पेरणीचा प्रश

कुंडलवाडी – यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पावसाने शेतकर्यांची परीक्षा घेतली आहे. जून महिना जवळपास पाण्याविनाच कोरडा गेल्याने पेरणीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर 28 जून रोजी पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर 29 जूनपासून शेतकर्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र पेरणी झाल्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्यांची चिंता वाढली. उगवलेली पिके पाण्याअभावी कोमेजू लागल्याने अनेक शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. पेरणीसाठी महागामोलाचे बियाणे खरेदी केल्यानंतर पाऊस गायब झाल्याने अनेक शेतकर्यांना पुन्हा बियाणे खरेदी करून दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली. बियाण्यांसोबतच पिकांवरील रोग-किडीच्या नियंत्रणासाठी लागणारी औषधेही वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. उपलब्ध औषधे महागड्या दराने घ्यावी लागत असल्याने शेतकर्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. दरम्यान, 20 ते 22 जुलैदरम्यान पावसाने हजेरी लावल्याने पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र पावसातील मोठ्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. पिकांना गरजेच्या वेळी पाणी न मिळाल्याने शेतकर्यांची चिंता कायम आहे. ऑगस्ट महिन्यात सध्या हवामानात मोठा बदल जाणवत आहे. दिवसभर ऊन आणि रात्री पाऊस असे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाचे सातत्य नसल्याने शेतकर्यांना पिकांच्या भवितव्याची चिंता सतावत आहे. पिकांच्या वाढीसाठी नियमित पावसाची आवश्यकता असताना पावसाचा लहरीपणा शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. परिसरात अधूनमधून पाऊस होत असला तरी अनेक तळी, नाले आणि नदीपात्रांमध्ये अद्याप समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे शेतीसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाणीसाठे भरून न निघाल्यास आगामी काळात पशुपालकांसमोर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दुबार पेरणीचा खर्च, महागडी बियाणे-औषधे, पावसातील खंड आणि पाण्याची टंचाई अशा दुहेरी-तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. आता पिकांना वाचविण्यासाठी सातत्यपूर्ण आणि दमदार पावसाची गरज असून, शेतकर्यांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे.

COMMENTS