बीड : इमामपूर रोडवरील डोंगर भागात सुरू असलेल्या अनधिकृत उत्खननावर महसूल प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या नेत

बीड : इमामपूर रोडवरील डोंगर भागात सुरू असलेल्या अनधिकृत उत्खननावर महसूल प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणारे दोन हायवा (टिप्पर) ताब्यात घेण्यात आले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेली ही कारवाई परिसरात मोठी चर्चेत आहे.
इमामपूर रोडलगतच्या डोंगर परिसरात काही दिवसांपासून बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी स्वतः पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी डोंगर भागातून मोठ्या प्रमाणावर मुरूम व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने तात्काळ कारवाई करत उत्खननातील साहित्य वाहून नेणारे दोन हायवा अडवले आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ते जप्त केले.
या धडक कारवाईत नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, मंडळ अधिकारी अनिल तांदळे, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कुलकर्णी, हरिदास काकडे, सचिन एरंडे, तफेदार दिनेश माने तसेच गणेश चव्हाण यांनी सक्रिय सहभाग घेतला. “अनधिकृत उत्खननामुळे डोंगरांचे नुकसान होऊन भूस्खलन आणि पर्यावरणाचा धोका वाढतो. अशा बेकायदेशीर कामांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही,” असा इशारा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिला असून संबंधितांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

COMMENTS