अहिल्यानगर: शहराजवळील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या

अहिल्यानगर: शहराजवळील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा हात चावल्याचा आणि त्याचा गळा दाबून त्याला सुमारे २० सेकंद हवेत उचलून धरल्याचा गंभीर आरोप शाळेच्या प्राचार्यांवर करण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात प्राचार्य गौतम बहादुर्गे यांच्याविरुद्ध बाल न्याय कायद्यांतर्गत (JJ Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित आठ वर्षीय विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमका काय घडला प्रकार?
तक्रारीनुसार, शाळेत वर्गातील काही विद्यार्थ्यांमध्ये भांडण सुरू असताना संबंधित चिमुकल्या विद्यार्थ्याने ही बाब वर्गशिक्षिका ज्योती मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिली. वर्गशिक्षिकेने प्राचार्य गौतम बहादुर्गे यांना वर्गात बोलावले. वर्गात आल्यानंतर प्राचार्यांनी भांडण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कान पिळले. त्यानंतर “भांडण कसे करतात ते दाखवतो,” असे म्हणत त्यांनी तक्रार सांगणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याचाच गळा पकडून त्याला हवेत उचलले. सुमारे वीस सेकंद (१ ते २० आकडे मोजत) त्याला हवेत धरून ठेवले आणि खाली सोडल्यानंतर त्याच्या हाताचा जोरात चावा घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
‘चुकून घडले, लेखी माफी मागतो’ – प्राचार्यांचा दावा
शाळेतून घरी गेल्यानंतर मुलाच्या हातावरील जखम आणि त्याची घाबरलेली अवस्था पाहून हा प्रकार पालकांच्या निदर्शनास आला. पालकांनी तात्काळ मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यानंतर पालकांनी प्राचार्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, “माझ्याकडून चुकून ही घटना घडली असून मी लेखी माफी मागतो,” असे प्राचार्यांनी सांगितल्याचा दावा पालकांनी केला आहे.
मात्र, लहान मुलावर अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक अत्याचार करणे अत्यंत गंभीर बाब असून संबंधित प्राचार्यांवर कठोर कारवाई करून कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी केली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

COMMENTS