Homeताज्या बातम्याअहमदनगर

नीट पेपरफुटीचे धागेदोरे पुणे, अहिल्यानगरपर्यंत !संशयितांना घेतले ताब्यात ; लाखोंच्या व्यवहारातून प्रश्‍नपत्रिका विक्री

अहिल्यानगर : देशभरात खळबळ उडालेल्या नीट 2026 पेपरफुटीचे धागेदोरे नाशिकनंतर आता पुणे आणि अहिल्यानगरपर्यंत येऊन पोहोचले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेन

सुवर्णा शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी
अहमदनगर महाविद्यालयातील हिंदी विभागाने विविध ऑनलाईन कार्यक्रमाने केला हिंदी पंधरवाडा उत्साहात साजरा
शहर सहकारी बँकेचे बोगस कर्ज प्रकरण आता चर्चेत ; पुरवठादार मालपाणीला झाली अटक


अहिल्यानगर : देशभरात खळबळ उडालेल्या नीट 2026 पेपरफुटीचे धागेदोरे नाशिकनंतर आता पुणे आणि अहिल्यानगरपर्यंत येऊन पोहोचले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने बुधवारी सकाळी अहिल्यानगरमध्ये कारवाई करत राहुरीतील धनंजय लोखंडे याच्यासह इतर काही जणांना ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. ताब्यात घेतलेले अहिल्यानगरच्या ग्रामीण भागातील असल्याची माहिती असून इतरांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. यांची नेमकी पेपरफुटीमध्ये कोणती भूमिका होती, याची माहिती समोर आलेली नाही.
तपास यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय लोखंडे याचे शेवटचे ठिकाण पुणे येथे आढळून आले होते. मात्र, तपासाची चाहूल लागताच त्याने तेथून पलायन केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर तो अहिल्यानगरमध्ये लपून बसल्याची माहिती समोर आल्यानंतर विशेष पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तांत्रिक विश्‍लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सध्या संशयिताची सखोल चौकशी सुरू असून, प्रश्‍नपत्रिका गैरप्रकाराचे जाळे नेमके किती राज्यांपर्यंत पसरले आहे, याचा शोध घेतला जात आहे. लवकरच त्याला मुख्य तपास यंत्रणेच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेतील गैरप्रकार उघड झाल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या सुमारे महिनाभर आधी राजस्थानातील शिकवणी केंद्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या सिकर परिसरात प्रश्‍नपत्रिका पोहोचल्याचा संशय आहे. परीक्षेच्या आदल्या रात्री लाखो रुपयांच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका पुरविण्यात आल्याचा आरोपही समोर आला आहे. कथित अंदाजपत्रिकेतील रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांतील अनेक प्रश्‍न मूळ प्रश्‍नपत्रिकेशी जुळल्याने संशय अधिक गडद झाला आहे. धनंजय लोखंडे हा नाशिक येथील आरोपी खैरनारचा मित्र असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, या संबंधातील अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. या गैरप्रकारात काही नामांकित शिकवणी संस्थांचे चालक किंवा मध्यस्थ सहभागी असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. प्रश्‍नपत्रिका गैरप्रकारामुळे देशभरातील सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अनिश्‍चिततेत सापडले आहे.
पुण्यातून एक महिला ताब्यात
पुणे पोलिसांनी देखील बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतले असून मनिषा वाघमारे असे या महिलेचे नाव असून, तिचे फोन, लॅपटॉप आणि अन्य तांत्रिक उपकरणे सीझ केली आहेत. मनिषा ही अहिल्यानगरमधून ताब्यात घेतलेल्या धनंजय लोखंडे याच्याशी सतत संपर्कात होती, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
तीन राज्यांत पोहोचला तपास
या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचला आहे. जयपूरमधून मनिष यादव या कथित सूत्रधाराला आधीच ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी नाशिकमधून डॉ. शुभम मधुकर खैरनार यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
लातूर कनेक्शनचीही चर्चा
या प्रकरणात आता लातूरचे नावही पुढे येत आहे. एका विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर लातूरमधील खासगी शिकवणी संस्थेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सराव परीक्षेत विचारण्यात आलेले 42 प्रश्‍न प्रत्यक्ष नीट परीक्षेत आल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे संबंधित संस्थेचा प्रश्‍नपत्रिका गैरप्रकाराशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांनी सुरू आहे.

COMMENTS