नांदेड : मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी रविवारी निसर्गाने आपला रौद्र आणि दिलासादायक असा दुहेरी आविष्कार दाखवत नांदेड शहरासह परिसराला अक्षरशः झोड

नांदेड : मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी रविवारी निसर्गाने आपला रौद्र आणि दिलासादायक असा दुहेरी आविष्कार दाखवत नांदेड शहरासह परिसराला अक्षरशः झोडपून काढले. दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक बदललेल्या हवामानामुळे काळ्या ढगांनी आकाश व्यापले आणि काही क्षणांतच वादळी वारे, विजांचा कडकडाट तसेच मुसळधार पावसाने शहराला जोरदार तडाखा दिला. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी वीजपुरवठा खंडित होणे, रस्त्यांवर पाणी साचणे आणि वाहतूक विस्कळीत होणे अशा समस्यांनाही सामोरे जावे लागले.
रविवारी सकाळपासूनच नांदेडकर उष्णतेच्या झळा सहन करत होते. तापमानासोबतच हवेत वाढलेला दमटपणा नागरिकांसाठी असह्य ठरत होता. दुपारनंतर अचानक वातावरणात मोठा बदल झाला. आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही क्षणांतच जोरदार वार्यासह पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे वातावरण भयावह बनले होते. अनेक नागरिकांनी दुकाने, कार्यालये आणि घरांमध्ये आश्रय घेतला. सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने शहरातील अनेक भागांना अक्षरशः जलमय केले. तरोडा नाका, चैतन्य नगर, वर्कशॉप, श्रीनगर, भाग्य नगर, आयटीआय, शिवाजी नगर, कला मंदिर, वजीराबाद, जुना मोंढा, सिडको, हडको, कवठा, असर्जन आदी भागांत मुसळधार पाऊस झाला. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकीस्वार आणि पादचार्यांची चांगलीच धावपळ उडाली. काही ठिकाणी वादळी वार्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटनाही घडल्या.
पावसासोबत आलेल्या जोरदार वार्यांचा परिणाम वीज यंत्रणेवरही झाला. अनेक भागांतील वीजवाहिन्यांवर ताण निर्माण झाल्याने शहरातील बहुतांश परिसराचा वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना उकाड्यानंतर अंधाराचाही सामना करावा लागला. व्यावसायिक आस्थापना, दुकाने आणि घरगुती कामकाजावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, मृग नक्षत्राच्या प्रारंभीच झालेल्या या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गात मात्र आनंदाचे वातावरण आहे. खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर झालेल्या या पावसामुळे जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाला असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे कोरडी पडलेली जमीन या पावसाने भिजल्याने शेतकर्यांच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या जोरदार पावसाने नांदेडकरांना उष्णतेपासून दिलासा दिला, तर दुसरीकडे निसर्गाच्या रौद्र रूपाचीही झलक दाखवली. आगामी काही दिवसांतही जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहून पावसाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने मान्सूनच्या आगमनाची चाहूल आता अधिक स्पष्टपणे जाणवू लागली आहे.

COMMENTS