Homeताज्या बातम्या

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी आ. संदीप क्षीरसागर कटिबद्ध; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला विकासकामांचा आराखडा

बीड: बीड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित

मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी मुख्य अभियंत्यासह तीन अधिकारी निलंबित!
श्रीगोंद्यातील प्रा. चेतन दिवाण यांची महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणावर सदस्य म्हणून नियुक्ती
‘आयबी’साठी शिर्डीऐवजी निमगाव कोऱ्हाळे येथे जागा; राज्य शासनाचा मोठा निर्णय

बीड: बीड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करत विकासकामांना तातडीने गती देण्याची मागणी केली. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ३१) जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आ. क्षीरसागर यांनी बीड शहरासह ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, औद्योगिक विकास, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते आणि सामाजिक विकासाशी संबंधित विविध मागण्या ठामपणे मांडल्या.

बीड जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि नागरिकांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आ. क्षीरसागर यांनी सांगितले. जनतेच्या हिताचे निर्णय मार्गी लावण्यासाठी सर्व विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार संदीप क्षीरसागर यांनी बैठकीत मांडलेल्या प्रमुख मागण्या:

  • मराठा भवन व वसतिगृह: बीड शहरातील जवाहर कॉलनी येथील उपलब्ध १० हजार चौरस फूट जागेवर मराठा भवनासोबतच विद्यार्थिनींसाठी सुसज्ज व अत्याधुनिक वसतिगृह उभारण्यात यावे आणि या कामासाठी तातडीने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा.
  • पंचतारांकित एमआयडीसी व रेशीम पार्क: बीड जिल्ह्यात औद्योगिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी बीड येथे पंचतारांकित एमआयडीसी मंजूर करण्यात यावी, ज्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच प्रस्तावित रेशीम पार्क बीड हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने व कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा उपलब्ध असल्याने बीड येथेच उभारण्यात यावा.
  • ड्रेनेज व्यवस्थेसाठी १० कोटींचा निधी: बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच शहरातील इतर भागांतील ड्रेनेज व्यवस्थेचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा.
  • आपत्ती व्यवस्थापनातून रस्ते दुरुस्ती: अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्यांची आपत्ती व्यवस्थापन निधीतून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
  • वृक्षलागवडीची विशेष तपासणी: सामाजिक वनीकरण, वन विभाग आणि रोहयो अंतर्गत झालेल्या वृक्षलागवडीच्या कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून विशेष तपासणी करण्यात यावी.
  • नियमित पाणीपुरवठा: १५ व्या वित्त आयोगातून थकीत वीज बिलाची तरतूद करून शहरातील नागरिकांना दोन दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा.
  • अत्याधुनिक रुग्णालय इमारत: बीड जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या जागेवर ५ ते ७ मजली अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात यावे.
  • रस्त्याचे काम: छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महालक्ष्मी चौक या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामासाठी एडीबी (ADB) योजनेंतर्गत निधी मंजूर करून काम तातडीने सुरू करावे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. संदीप क्षीरसागर यांनी मांडलेल्या विविध मागण्यांमुळे बीड शहर व मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना मोठा वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS