नांदेड : एक गाव - एक मसनवटा या संकल्पनेतून प्रत्येक गावात सुसज्ज सार्वजनिक स्मशानभूमी उभारण्याचा पुढाकार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतला असून

नांदेड : एक गाव – एक मसनवटा या संकल्पनेतून प्रत्येक गावात सुसज्ज सार्वजनिक स्मशानभूमी उभारण्याचा पुढाकार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतला असून, लोहा मतदारसंघातील आठ गावांसाठी सार्वजनिक स्मशानभूमीच्या जागांचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. देऊळगाव येथे दफनभूमीसाठी 20 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, लवकरच सर्व स्मशानभूमींमध्ये आवश्यक सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार चिखलीकर यांनी दिली.
लोहा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सार्वजनिक स्मशानभूमीची समस्या दीर्घकाळ प्रलंबित होती. यासाठी सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचून आता पूर्ण झाली आहे. तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी याबाबत आढावा घेऊन प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मतदारसंघातील ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नव्हती, त्या गावांसाठी जागा मिळवून देण्यासाठी आमदार चिखलीकर यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महसूल प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा केला. भूसंपादन पूर्ण झालेल्या गावांमध्ये मंगरूळ (20 आर), रामतीर्थ (20 गुंठे), गौंडगाव (20 गुंठे), करमाळा (15 गुंठे), देऊळगाव (20 गुंठे दफनभूमी), कापशी खुर्द (20 आर), कामळज (15 गुंठे) व डोलारा (20 गुंठे) या गावांचा समावेश आहे. संबंधित दस्तनोंदणी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. याशिवाय कांजाळा तांडा, कदमाची वाडी येथे खाजगी भूसंपादन प्रस्तावित असून, जोशी सांगवी, गुंडेवाडी आदी गावांतील स्मशानभूमीच्या जागांसाठीही प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर प्रगतीपथावर असल्याची माहिती देण्यात आली. स्मशानभूमी अद्ययावत करण्यावर भर स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी येणार्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था, पावसाळा व उन्हाळ्यात संरक्षण मिळावे यासाठी शेड, दाहिनी सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच स्वच्छता उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी डीपीडीसीमधून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार चिखलीकर यांचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले. ज्या गावांमध्ये स्मशानभूमी संदर्भात वाद किंवा रस्त्याच्या समस्या आहेत, त्या ठिकाणी सामोपचाराने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असून, ज्या गावांमध्ये दफनभूमीची सुविधा नाही तेथेही लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेसाठी उपविभागीय अधिकारी नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार मोकले, नायब तहसीलदार पाठक, सहाय्यक महसूल अधिकारी गायकवाड तसेच संबंधित गावांचे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.

COMMENTS