कोपरगाव : मतदारसंघात शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाण

कोपरगाव : मतदारसंघात शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरांवरील पत्रे उडाली, झाडे कोसळली, फळबागांसह पिकांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी बाधित गावांना भेट देत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रशासनाकडून सुरू असलेल्या पंचनाम्यांचा आढावा घेतला.
शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याच्या तडाख्यानंतर आमदार काळे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर रविवारी (दि. २४) त्यांनी स्वतः नुकसानग्रस्त गावांना भेटी देत परिस्थितीची पाहणी केली. वादळामुळे घरांचे झालेले नुकसान, फळबागा, रोपवाटिका तसेच उन्मळून पडलेल्या झाडांमुळे जनावरांचे गोठे व इतर मालमत्तेचे झालेले नुकसान त्यांनी प्रत्यक्ष पाहिले व नागरिकांना धीर दिला.
दरम्यान, त्यांनी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते तसेच तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्याकडून पंचनाम्यांची माहिती घेतली. “मतदारसंघातील सर्व नुकसानग्रस्त गावांतील पंचनामे वेळेत पूर्ण करून तातडीने शासनाकडे अहवाल सादर करावा. पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी,” अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

COMMENTS