अकोले : गगनातील तारांगण जणू पृथ्वीवर उतरलंय… दाट जंगलात लाखो दिव्यांची रोषणाई झाल्यासारखा भास… आणि सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाने उधळलेला प्रकाशाच

अकोले : गगनातील तारांगण जणू पृथ्वीवर उतरलंय… दाट जंगलात लाखो दिव्यांची रोषणाई झाल्यासारखा भास… आणि सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाने उधळलेला प्रकाशाचा जादुई उत्सव! अकोले तालुक्यातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात सध्या काजव्यांचा अनोखा महोत्सव रंगला असून, हा अद्भुत निसर्गसोहळा पाहण्यासाठी हजारो पर्यटकांची गर्दी होत आहे.
मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये काजव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. रात्रीच्या अंधारात लाखो काजवे एकाच वेळी चमचमत असल्याने संपूर्ण जंगल परिसर जणू तारकांनी सजल्याचा भास निर्माण होतो. भंडारदरा परिसर, कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य, रतनवाडी, पाचनई, सांदनदरी यांसारखे भाग सध्या या प्रकाशमय दृश्याने उजळून निघाले आहेत.
ग्रीष्म ऋतू संपत असताना आणि पावसाळ्याच्या चाहुली सुरू होताच वातावरणातील आर्द्रता वाढते. याच काळात काजव्यांचा प्रजनन हंगाम सुरू होतो. मादी काजव्यांना आकर्षित करण्यासाठी नर काजवे आपल्या शरीरातून प्रकाश निर्माण करतात. हा प्रकाश एकाच वेळी हजारो-लाखो काजव्यांमधून झळकत असल्याने संपूर्ण जंगल एखाद्या स्वप्नवत दुनियेसारखे भासते.
दाट जंगल, ओलसर माती, शांत वातावरण आणि स्वच्छ हवा यामुळे सह्याद्री परिसर काजव्यांसाठी अत्यंत पोषक अधिवास मानला जातो. त्यामुळेच अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसराला “काजव्यांची मायानगरी” अशी ओळख मिळाली आहे. हा दुर्मीळ निसर्गमहोत्सव अनुभवण्यासाठी राज्यभरातून पर्यटक, ट्रेकर्स, निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफर्स अकोलेकडे आकर्षित होत आहेत.
या ठिकाणी पाहावेत काजवे भंडारदरा धरणाच्या मुतखेल नाक्यावरून प्रवास करताना मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी परिसरात काजवे पाहता येतील. तसेच हरिश्चंद्रगड परिसर, पाचनई, सातेवाडी, फोफसंडी परिसरातील डोंगररांगा आणि शेंडीच्या टोलनाक्यावरून जाताना पांजरे, उडदावणे, घाटघर, सांदनदरी या ठिकाणी पर्यटकांना काजव्यांची मनमोहक रोषणाई अनुभवता येईल.

COMMENTS