देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा परिसरात ड्रोनसह हत्यारबंद तरुणांच्या वावराची दहशत चौथ्या दिवशीही कायम असून नागरिक अजूनही भीतीच्या छायेखाली जगत आह
देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा परिसरात ड्रोनसह हत्यारबंद तरुणांच्या वावराची दहशत चौथ्या दिवशीही कायम असून नागरिक अजूनही भीतीच्या छायेखाली जगत आहेत. वाकाण वस्ती, वाळूंज वस्ती, देठे वस्ती, देवगिरे वस्ती यांच्यानंतर आता कणगर, वडनेर, गुहा, आंबी, केसापूर आणि गडदे आखाडा परिसरातही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी उडणारे ड्रोन, विनानंबरच्या मोटारसायकली आणि स्कॉर्पिओ वाहनांमधून फिरणारे हत्यारबंद तरुण यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. संशयित टोळ्या फिरत असल्याने नागरिक रात्रभर जागून पहारा देत आहेत. दरम्यान, राहुरी व श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमधील भीती आणखी वाढली आहे.
ग्रामस्थांनी वारंवार माहिती देऊनही पोलीस प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरात तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवून रात्रीची गस्त सुरू करावी आणि ड्रोनचा वापर करणाऱ्या संशयितांचा शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
प्रशासकीय व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे ‘कोट’
राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे सरकारी ड्रोन असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र ड्रोन उडविण्यास महसूल विभागातून परवानगी दिलेली नाही. पोलीस नागरिकांची दिशाभूल करत असून यातून मोठी घटना घडण्याची भीती आहे. – बाळासाहेब मुसमाडे, पोलीस पाटील, कणगर.
देवळाली प्रवरा परिसरात रात्री उडणाऱ्या ड्रोनविषयी पोलीस निरीक्षक व तहसीलदारांशी संपर्क साधला. परंतु, प्रशासन अनभिज्ञ असल्याचे जाणवले. पोलीस फिरकले सुद्धा नाहीत. परप्रांतीय चोरट्यांची टोळी हे उद्योग करीत असावी अशी शंका आहे. पोलिसांनी वेळीच खबरदारी न घेतल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. – सर्जेराव घाडगे, सरपंच, कणगर.
विविध भागांत रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालतात, अशी माहिती नागरिकांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली असता रात्री ड्रोन उडविण्यास कुणालाही परवानगी दिलेली नाही. हे विनापरवाना ड्रोन असावेत, पोलीस प्रशासनाला याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. – डॉ. अमित पवार, तहसीलदार, राहुरी.

COMMENTS