Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

मिलरचा आत्मघातकी निर्णण आणि दिल्लीचा पराभव

आयपीएलच्या रणसंग्रामात अनेकदा असे सामने पाहायला मिळतात, जे शेवटच्या चेंडूपर्यंत चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचवतात. पण, बुधवारी दिल्लीच्या अरुण

’महाराष्ट्र केसरी’ची नवी ओळख महिला कुस्तीगिरांना मिळावी : दिपाली सय्यद
एमएस धोनीची हेअरस्टाईल चर्चेत, जुन्या लूक मध्ये दिसले
रायफल शूटिंग स्पर्धेत कु. आयुषा भांड हिचे नेत्रदिपक यश

आयपीएलच्या रणसंग्रामात अनेकदा असे सामने पाहायला मिळतात, जे शेवटच्या चेंडूपर्यंत चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचवतात. पण, बुधवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर जे घडले, ते केवळ थरारकच नव्हते, तर क्रिकेटमधील रणनीती आणि मानवी चुकांचे एक जिवंत उदाहरण ठरले. दिल्ली कॅपिटल्सच्या हातात असलेला विजय एका चुकीच्या निर्णयामुळे वाळूच्या कणासारखा निसटून गेला आणि गुजरात टायटन्सने एका धावेने विजय मिळवत 2026 च्या हंगामातील आपले विजयाचे खाते उघडले. हा सामना केवळ धावांचा पाऊस नव्हता, तर अनुभवाचा कस आणि दबावाखालील मानसिकतेची परीक्षा होती. नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गुजरातच्या सलामीवीरांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. गुजरातची सुरुवातच ’स्टॉर्म’ सारखी झाली. शुभमन गिलने मैदानावर येताच दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. गिलने आपल्या नेहमीच्या नजाकतभर्‍या शैलीत मैदानाच्या चारी बाजूंना फटकेबाजी केली. त्याला जोस बटलरची साथ लाभली. बटलरने सुरुवातीला थोडा वेळ घेतला, पण एकदा जम बसल्यावर त्याने 52 धावांची वेगवान खेळी केली. गिलने कर्णधाराला साजेशी 70 धावांची खेळी साकारताना गुजरातला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. मधल्या फळीत वॉशिंग्टन सुंदरने अनपेक्षितरित्या आक्रमक रूप धारण करत 55 धावा कुटल्या. या तिघांच्या अर्धशतकी योगदानामुळे गुजरातने निर्धारित 20 षटकांत 210 धावांचा डोंगर उभा केला. दिल्लीच्या गोलंदाजांनी शेवटच्या काही षटकांत धावा रोखण्याचा प्रयत्न केला, पण तोवर गुजरातने सन्मानजनक धावसंख्या गाठली होती. 211 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला गरज होती ती एका आक्रमक सुरुवातीची. पथुम निसंका आणि केएल राहुल या जोडीने तशीच सुरुवात करून दिली. राहुलने सुरुवातीपासूनच चेंडूचा टायमिंग साधत मैदानात फटकेबाजी केली. मात्र, निसंंका आणि पाठोपाठ आलेले फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने दिल्लीचा डाव 101 धावांवर 3 गडी बाद असा काहीसा अडचण वाढविणारा झाला. येथे केएल राहुलने आपली एकाग्रता भंग होऊ दिली नाही. त्याने आपल्या नैसर्गिक खेळाला गती देत धावांचा ओघ चालू ठेवला. राहुलने 92 धावांची खेळी करून दिल्लीला विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आणून ठेवले होते. दुर्दैवाने, शतकाच्या उंबरठ्यावर असताना तो बाद झाला आणि दिल्लीच्या गोटात चिंतेचे ढग दाटले. यावेळी डेव्हिड मिलर, ज्याला आपण ’किलर मिलर’ म्हणून ओळखतो, तो दिल्लीसाठी फिनिशरची भूमिका बजावत होता. मिलरला दुखापत झाल्यामुळे तो काही काळ मैदानाबाहेर गेला होता, पण राहुल बाद झाल्यानंतर तो पुन्हा जिद्दीने मैदानात परतला.
शेवटच्या षटकामध्ये नाट्याची परिसीमा ओलांडली गेली. सामना अशा वळणावर आला होता जिथे दिल्लीला विजयासाठी शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता होती. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने चेंडू प्रसिद्ध कृष्णाच्या हातात सोपवला. मैदानात डेव्हिड मिलर आणि नवखा विप्राज निगम होते. प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्याच चेंडूवर विप्राज निगमने एक खणखणीत चौकार मारला. आता समीकरण 5 चेंडूत 9 धावा असे सोपे झाले होते. दुसरा चेंडू कृष्णाने उसळता चेंडू टाकला, ज्यावर फटका मारण्याच्या नादात निगम बाद झाला. शुभमन गिलने एक चित्तवेधक झेल टिपला. सामना पुन्हा फिरला.  आता 4 चेंडूत 9 धावांची गरज होती. तिसरा चेंडू कुलदीप यादव क्रीझवर आला. त्याने हुशारीने एक धाव घेतली आणि मुख्य फलंदाज डेव्हिड मिलरला स्ट्राईक दिली. आता 3 चेंडूत 8 धावांची गरज होती. चौथा चेंडू मिलरने आपल्या शक्तीचे दर्शन घडवत चेंडू सीमारेषेबाहेर फेकून दिला. एक उत्तुंग षटकार मारला. आता दिल्लीला विजयासाठी फक्त 2 चेंडूत 2 धावा हव्या होत्या. संपूर्ण स्टेडियम दिल्लीच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी सज्ज झाले होते. पाचवा चेंडूवर सामना फिरला आणि येथेच या सामन्यातील सर्वात मोठे ’ब्लंडर’ घडले. पाचव्या चेंडूवर मिलरने शॉट मारला, तो सहजपणे एक धाव पूर्ण करू शकला असता. क्रिकेटच्या नियमानुसार, ती एक धाव घेतली असती तर स्कोअर बरोबर झाला असता आणि दिल्लीचा पराभव टळला असता. पण, मिलरने आपल्या स्ट्राईकवर आणि क्षमतेवर फाजील विश्‍वास दाखवत ती धाव घेण्यास चक्क नकार दिला. त्याला वाटले की, तो शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारून सामना जिंकेल. याच एका निर्णयाने दिल्लीच्या नशिबाचे चक्र उलटे फिरले. तर शेवटच्या सहाव्या चेंडूवर शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती. मिलरने जोरकस प्रहार केला, पण चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला. धाव घेण्यासाठी मिलर धावला, पण यष्टीमागे उभ्या असलेल्या जोस बटलरने विजेच्या वेगाने चेंडू पकडून थेट थ्रो मारला. कुलदीप यादव धावबाद झाला आणि दिल्लीचा संघ 209 धावांवर रोखला गेला. गुजरातने 1 धावेने हा सामना जिंकला. सामन्यानंतर अनेकांनी मिलरच्या त्या निर्णयावर कडाडून टीका केली. अनुभवी फलंदाज असूनही मिलरने ’सिंगल’ का नाकारली, हा प्रश्‍न सर्वांना सतावत आहे. जर त्याने ती धाव घेतली असती, तर शेवटच्या चेंडूवर 1 धाव हवी असती आणि सामना टाय झाला असता तरी सुपर ओव्हरची संधी दिल्लीला मिळाली असती. मात्र, अतिआत्मविश्‍वास नडला आणि प्रसिद्ध कृष्णाने शेवटच्या चेंडूवर जो दबाव टाकला, तो गुजरातसाठी फायदेशीर ठरला. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा पराभव नवा नाही. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा एका धावेच्या फरकाने सामना गमावणारा दिल्ली हा एकमेव संघ ठरला आहे. सन 2015 मध्ये चेन्नई, 2016 मध्ये गुजरात लायन्स, 2021 मध्ये आरसीबी आणि आता 2026 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्लीने हा नकोसा इतिहास पुन्हा गिरवला. या विजयासह गुजरात टायटन्सने स्पर्धेत आपले पुनरागमन केले आहे. सलग दोन पराभवानंतर हा विजय त्यांच्यासाठी ’बूस्टर डोस’ ठरणार आहे. गुजरात आता गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर पोहोचले आहे. दुसरीकडे, सुरुवातीचे दोन सामने जिंकणार्‍या दिल्लीचा विजयरथ या पराभवामुळे रोखला गेला आहे. दिल्ली सध्या चौथ्या स्थानावर असली तरी, या पराभवातून त्यांना मोठे धडे घ्यावे लागणार आहेत. अरुण जेटली स्टेडियमवरचा हा सामना केवळ एका विजयाची नोंद नव्हता, तर तो मिलरच्या त्या एका अजब निर्णयासाठी आणि गुजरातच्या जिद्दीसाठी कायमस्वरूपी स्मरणात राहील. क्रिकेटमध्ये ’जो जिता वही सिकंदर’ हेच सत्य असते आणि त्या एका धावेने गुजरातला या हंगामात नवसंजीवनी दिली आहे.

शुभमन गिलला 12 लाखांचा दंड
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला आयपीएल 2026 मध्ये धीम्या गोलंदाजीच्या दरामुळे 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर करण्यात आली. आयपीएलने जारी केलेल्या मीडिया सल्लागारानुसार, गुजरात टायटन्सने सामन्यादरम्यान निर्धारित वेळेत आपले षटके पूर्ण केली नाहीत. या हंगामातील संघाची ही पहिली चूक होती, त्यामुळे आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार गिलवर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. गुजरात टायटन्सचा या हंगामातील हा पहिला विजय होता. आता संघाचा पुढील सामना लखनऊ सुपर जायंट्सशी लखनऊमध्ये रविवारी होईल. तर, दिल्ली कॅपिटल्सचा संघ शनिवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध चेन्नईमध्ये खेळेल. आयपीएलमध्ये प्रत्येक संघाला निर्धारित वेळेत आपले 20 षटके पूर्ण करावी लागतात. जर संघ असे करू शकला नाही, तर त्याला स्लो ओव्हर-रेट मानले जाते आणि शिक्षा दिली जाते. एक डाव साधारणपणे 90 मिनिटांत पूर्ण करायचा असतो. मधले टाइम-आउट आणि इतर ब्रेक वगळता, षटकांच्या गतीवर लक्ष ठेवले जाते आणि सामना अधिकारी यांचे याकडे पूर्णपणे लक्ष असते.

डॉ.दत्ता विघावे
मो : 9096372082

COMMENTS