मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोच्या मध्यवर्ती भागातील एका रेस्टॉरंटमध्ये शनिवारी झालेल्या भीषण स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून, किमान २१ जण गंभी
मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोच्या मध्यवर्ती भागातील एका रेस्टॉरंटमध्ये शनिवारी झालेल्या भीषण स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून, किमान २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये स्फोटके घेऊन आलेल्या संशयित महिलेसह प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक आणि एका ग्राहकाचा समावेश असल्याची माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मॉस्कोतील कुद्रिन्स्काया चौक परिसरातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये एका अज्ञात महिलेने स्फोटक उपकरणासह प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने तिला अडवल्यानंतर काही क्षणांतच जोरदार स्फोट झाला. या स्फोटात ती महिला आणि सुरक्षा रक्षक जागीच ठार झाले, तर रेस्टॉरंटमधील एका ग्राहकालाही आपला जीव गमवावा लागला. जखमी झालेल्या २१ जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
रशियन तपास यंत्रणांनी या स्फोटाचा सखोल तपास सुरू केला असून स्फोटामागील कारणे आणि वापरण्यात आलेली स्फोटके याचा शोध घेतला जात आहे. हे रेस्टॉरंट मॉस्कोतील स्टॅलिनकालीन प्रसिद्ध उंच इमारतींपैकी एका इमारतीत असून, घटनेच्या वेळी तिथे एक खाजगी समारंभ सुरू होता. दरम्यान, गेल्या काही वर्षांत मॉस्को परिसरात उच्चपदस्थ रशियन लष्करी अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले झाले आहेत; मात्र या ताज्या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसून सर्व शक्यता पडताळून चौकशी केली जात आहे.

COMMENTS