मुंबई : राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे नद्या, ओढे आणि धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंढरपूर, सातारा, सांगली, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
उजनी आणि वीर धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने पंढरपूरमधील भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नदीने इशारा पातळी ओलांडली असून धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. व्यास नारायण वसाहतीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
दुसरीकडे सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीने रौद्र रूप धारण केले आहे. लिंब-गोवे परिसरातील ऐतिहासिक कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून सर्व मार्ग बंद झाले आहेत. धोम आणि बलकवडी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने मोठा विसर्ग सुरू आहे.
पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने घाटमाथ्यावर दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घातली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS