मुंबई - मुंबई पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का देणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. अमली पदार्थांची विक्री करत असल्याच्या संशयावरून मालवणी पोलिसांनी ज

मुंबई – मुंबई पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का देणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. अमली पदार्थांची विक्री करत असल्याच्या संशयावरून मालवणी पोलिसांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाला अटक केली आहे. किरण इंदुलकर असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी जाळे रचून त्याला ५ ग्रॅम मेफेड्रॉन या अमली पदार्थासह ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
किरण इंदुलकर हा सध्या जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. यापूर्वी त्याची नियुक्ती मालवणी पोलीस ठाण्यात होती. मालवणी परिसरात कार्यरत असताना तो अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे परिसरातील अमली पदार्थांच्या व्यवहारांबाबत त्याला माहिती मिळालेली असण्याची शक्यता तपासून पाहिली जात आहे.
अमली पदार्थांच्या विक्रीबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे मालवणी पोलिसांनी सापळा रचला होता. या कारवाईदरम्यान इंदुलकर याला अमली पदार्थांची विक्री करताना पकडण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याच्याकडून ५ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, त्याचा अमली पदार्थांच्या व्यवहारातील इतर व्यक्तींशी काही संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे. इंदुलकर याच्याविरोधात यापूर्वीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्याची माहिती समोर आली आहे. नायगाव येथील बीडीडी चाळ परिसरातील रहिवासी असलेल्या इंदुलकर याच्यावर दोन वर्षांपूर्वीही कारवाई करण्यात आली होती. त्याला ताकीद देण्यात आली होती तसेच मालवणी पोलीस ठाण्यातून त्याची बदली करण्यात आली होती. यापूर्वी त्याच्यावर निलंबनाची कारवाईही झाल्याचे सांगण्यात येते.

COMMENTS