मुंबई - टाटा समूहातील महत्त्वाच्या नेतृत्वबदलाच्या चर्चेने शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. टाटा समूहाची मुख्य प्रवर्तक संस्था असलेल्या 'टाटा सन

मुंबई – टाटा समूहातील महत्त्वाच्या नेतृत्वबदलाच्या चर्चेने शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. टाटा समूहाची मुख्य प्रवर्तक संस्था असलेल्या ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन पदमुक्त होण्याची शक्यता व्यक्त करणारे वृत्त समोर आल्यानंतर समूहातील प्रमुख कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. विशेषतः टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) समभागात जवळपास ५ टक्क्यांची घट नोंदवली गेली.
बुधवारी सकाळी शेअर बाजाराचा निर्देशांक (Sensex) सुमारे ५४१ अंकांनी घसरून ७७ हजार ६१३ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (Nifty) १६८ अंकांनी घसरून २४ हजार ३०४ अंकांवर व्यवहार करत होता. १८ ऑगस्ट रोजी टाटा सन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) होणार आहे. या सभेपूर्वी चंद्रशेखरन यांच्या पदत्यागाच्या चर्चेला उधाण आले असून, त्यांच्या फेरनियुक्तीबाबत भागधारकांकडून मतदान होणार असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून टाटा समूहातील विविध कंपन्यांच्या समभागांवर विक्रीचा दबाव वाढला आहे.
बुधवारी सकाळी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा समभाग सुमारे ४.५५ टक्क्यांनी घसरून २ हजार ३३७ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. याशिवाय टाटा ग्राहक उत्पादने (१.६%), टायटन (१.३%), टाटा स्टील (१.१३%) आणि इंडियन हॉटेल्स (१.०४%) यांच्या समभागातही घट झाली. टाटा टेक्नॉलॉजीज, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि टाटा मोटर्सच्या समभागांमध्येही सुमारे १ टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली.
यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, टाटा समूहाशी संबंधित धर्मादाय संस्थांचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला विरोध दर्शवल्यानंतर टाटा सन्सने हा निर्णय पुढे ढकलला होता. त्यामुळे आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष लागले आहे. चंद्रशेखरन यांनी १९८७ मध्ये टाटा समूहात प्रवेश केला होता. २००९ मध्ये ते टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) झाले आणि २०१७ मध्ये त्यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
गुंतवणूकदारांच्या नजरा १८ ऑगस्टच्या सभेकडे चंद्रशेखरन यांच्या पदत्यागाबाबत निश्चित निर्णय समोर आला नसला, तरी या वृत्ताचा बाजारावर तातडीने परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणामांमुळे बाजारात आधीच दबावाचे वातावरण होते; त्यातच टाटा समूहातील या चर्चेने गुंतवणूकदारांच्या चिंतेत अधिक भर घातली आहे.

COMMENTS