नांदेड : नांदेड शहर आणि परिसरात वाढत्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून नांद

नांदेड : नांदेड शहर आणि परिसरात वाढत्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने कामठा परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे.
या धाडीत तब्बल 41 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकी वाहने असा एकूण 11 लाख 47 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांना ‘खबर’ हेल्पलाईनद्वारे मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. नांदेड शहरालगत असलेल्या गाडेगाव रोडवरील कामठा गावात मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी तात्काळ विशेष पथक तयार करून संबंधित ठिकाणी रवाना केले. दि. 27 मार्च 2026 रोजी या पथकाने जगनलाल देवीलाल यादव यांच्या मालकीच्या जागेवर असलेल्या टीनशेडवर अचानक छापा टाकला. छाप्यावेळी तेथे ‘पप्पू’ नावाचा जुगार सुरू असल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 41 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 1 लाख 50 हजार 950 रुपये रोख रक्कम, 37 मोबाईल फोन आणि 12 मोटारसायकली असा एकूण 11 लाख 47 हजार 950 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली असून, आरोपींना रंगेहात पकडल्याने पोलिसांच्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हा केवळ जुगार अड्डा नसून येथे जुगार खेळण्याचे ‘प्रशिक्षण’ दिले जात असल्याचे उघड झाले आहे. प्राथमिक तपासात मिळालेल्या कागदपत्रांनुसार, बीड जिल्ह्यातील चिंचवडगाव (ता. वडवणी) येथील ‘राज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ’ या संस्थेमार्फत हे प्रशिक्षण केंद्र चालवले जात होते. यापूर्वी परभणी जिल्ह्यातील लिमला (ता. ताडकळस) आणि मरडसगाव (ता. गंगाखेड) येथेही अशाच प्रकारची केंद्रे कार्यरत होती, ज्यावर याच विशेष पथकाने कारवाई केली होती. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 112/2026 अंतर्गत महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांच्याकडे सोपवण्यात आला असून, या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे.
दरम्यान, ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड तसेच पोलीस कॉन्स्टेबल गणेश धुमाळ आणि तानाजी गवळी यांच्या पथकाने पार पाडली. त्यांच्या या धाडसी आणि प्रभावी कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले असून, 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

COMMENTS