Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारनेरमध्ये वादळ अन् गारपिटीने जनजीवन विस्कळीत; पत्रे उडाले; गोठ्यांची पडझड; गारांनी झोडपले; शेतीचे नुकसान

    पारनेर : तालुक्याच्या उत्तर भागात बुधवारी (दि. १ एप्रिल) सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने मोठे नुकसान करत जनजीवन विस्कळीत केले

गॅस वितरणाचे योग्य नियोजन करा;आ. काळेंच्या प्रशासकीय यंत्रणा व वितरकांना सूचना; कोपरगावात गॅस टंचाईची झळ
रांजणगाव रोड येथे हनुमान जयंती उत्साहात
घोडेश्वरी देवी यात्रोत्सवास उद्यापासून प्रारंभ  

    पारनेर : तालुक्याच्या उत्तर भागात बुधवारी (दि. १ एप्रिल) सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने मोठे नुकसान करत जनजीवन विस्कळीत केले. वासुंदे, पळशी, वनकुटे, खडकवाडी व वडगाव सावताळ परिसरात निसर्गाच्या या तडाख्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. घरावरील पत्रे उडणे, विजेचे खांब कोलमडणे आणि शेती पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीतून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा एकदा निसर्गाने घाला घातला. वासुंदे परिसरातील बोकनकवाडी, शिक्री, खडकवाडीतील जांभळवाडी तसेच पळशीतील चिमणीबारव भागात वारे इतक्या वेगाने वाहत होते की बघता बघता उभ्या पिकांचे नुकसान झाले. प्रामुख्याने कांदा, मिरची, झेंडू, टरबूज, डाळिंब, गहू आणि आंबा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच उन्हाळ्यासाठी साठवून ठेवलेला ज्वारी आणि बाजरीचा वैरणीचा चारा पावसात भिजल्याने कुजण्याची भीती निर्माण झाली असून जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.वादळाचा वेग इतका भीषण होता की अनेक भागांत घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे कागदासारखे उडून गेले.

 आधुनिक शेतीसाठी बसवलेले सौर पॅनलही या गारपिटीतून सुटू शकले नाहीत.  हवामान खात्याने पुढील २-३ दिवस पुन्हा अशाच पावसाचा अंदाज वर्तवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करून बाधितांना आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. ज्यांची घरे पडली आहेत त्यांना नवीन घरे बांधून द्यावीत आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी आर्त हाक ग्रामस्थांनी सरकारला दिली आहे. बुधवार दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी पाडळी आळे, म्हस्केवाडी, रेनवडी, अळकुटी परिसरात वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला. शेतकर्‍यांसहीत सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना तसेच सर्वसामान्य जनतेला नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख डॉ. भास्करराव शिरोळे यांनी केली.

COMMENTS