बीड: जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, जिजाऊ माँ साहेब को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मातोश्री को-ऑपरेटिव्ह य

बीड: जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, जिजाऊ माँ साहेब को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मातोश्री को-ऑपरेटिव्ह यांसारख्या इतरही वित्तीय संस्थांनी जनतेची व ठेवीदारांची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी, ठेवीदारांची हक्काची रक्कम परत मिळवून देण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाईला गती देण्याचे स्पष्ट निर्देश राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महाराष्ट्र ठेवीदार (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंध संरक्षण अधिनियम’ (MPID Act) च्या अंमलबजावणीसंदर्भात पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस खासदार बजरंग सोनवणे, पर्यावरण व हवामान बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, आमदार नमिता मुंदडा, आमदार सुरेश धस, पालक सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी फसवणूक करणाऱ्या वित्तीय संस्थांवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि विशेष न्यायालयामार्फत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे वसूल करण्याच्या कायदेशीर प्रक्रियेबाबत सादरीकरण केले.
याच बैठकीत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आणि परिसर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा तसेच आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (SRTR) आढावा घेण्यात आला. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासाचा मास्टर प्लॅन स्व. अजितदादा पवार यांनी तयार केला होता; त्यानुसारच या रुग्णालयाचा आणि परिसराचा विकास पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सुनेत्रा पवार यांनी यावेळी केले.

COMMENTS