गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विक्रमी 25 लक्ष वृक्ष लागवड व संवर्धन महाअभियानाचा

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विक्रमी 25 लक्ष वृक्ष लागवड व संवर्धन महाअभियानाचा परळी वैजनाथ येथे उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. या अभियानाला विविध नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, सामाजिक संस्था, शेतकरी आणि हजारो नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून, शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 8 लाख फळबाग व सामाजिक वृक्ष लागवडीची नोंद करण्यात आली. हा शुभारंभ जलनायक मयंक गांधी, परळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, मुख्याधिकारी श्री. निगळ, हरित लातूर चळवळीचे डॉ.पवन लड्डा, वन परिक्षेत्र अधिकारी भगवानराव गित्ते, साई अकादमीचे चव्हाण तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. हे अभियान 23 ते 29 जुलै या कालावधीत संपूर्ण मराठवाड्यात लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे.
प्रभू वैद्यनाथांच्या पावन नगरीत ग्लोबल विकास ट्रस्ट, परळी नगरपरिषद आणि वृक्षसंवर्धन चळवळीच्या संयुक्त विद्यमाने शहरात 3 लाख वृक्षांची लागवड व संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन 10 हजार बेलवृक्षांची लागवड करण्यात येणार असून, औष्णिक विद्युत केंद्राने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर घनदाट वन (मियावाकी पद्धतीने) वृक्ष लागवड केली जाणार आहे. या अभियानासाठी आवश्यक वृक्षरोपे ग्लोबल विकास ट्रस्ट उपलब्ध करून देत असून, लागवडीनंतर त्यांचे संगोपन करण्याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद आणि वृक्षसंवर्धन चळवळीने स्वीकारली आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जलनायक मयंक गांधी म्हणाले, परळी वैजनाथ ही प्रभू वैद्यनाथांच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी आहे. या शहराला धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वप्रथम पाण्याची उपलब्धता आवश्यक होती. त्यामुळे ग्लोबल विकास ट्रस्टने यावर्षी परळी तालुक्यात 114 किलोमीटर नदीचे खोलीकरण व रुंदीकरण, तसेच रिचार्ज बोअरवेल उभारणीचे महत्त्वपूर्ण काम केले. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. आता जलसमृद्धीनंतर पर्यावरण समृद्धीचा संकल्प आपण वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पूर्ण करत आहोत. लोकसहभागातून राबविले जाणारे हे अभियान परळी तालुक्याला जल, हरित आणि पर्यावरण समृद्ध बनविणारे ठरेल. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सुरू झालेल्या या ऐतिहासिक अभियानाला संपूर्ण परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना तसेच वैयक्तिक स्तरावर हजारो शेतकरी आणि नागरिक या अभियानात सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी 8 लाख वृक्ष लागवडीची नोंद झाल्याने हे अभियान पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने लोकचळवळ ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

COMMENTS